नाशिक : पेठ तालुक्यातील बोरवड येथील आदिवासी आश्रमशाळेतील वर्ग चारचे कर्मचारी गौरव अहिरे (२१) यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आदिवासी तृतीय व चतुर्थ कर्मचारी संघटनेच्या वतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मागील दोन महिन्यांहून अधिक काळापासून येथील आदिवासी विकास भवन परिसरात ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात ५०० हून अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत हा गुंता सोडविण्यासाठी साकडे घातले. परंतु, यश न आल्याने ६० दिवस उलटल्यानंतरही आंदोलन सुरुच आहे. बोरवड येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे कर्मचारी गौरव अहिरे यांनी आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर आंदोलक अधिकच आक्रमक झाले आहेत.

कुटूंबातील अन्य लोकांकडून सातत्याने नोकरीविषयी विचारणा होत असल्याने तसेच सरकार मागण्यांविषयी कोणताही निर्णय घेत नसल्याने गौरव यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. गौरव यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे कुटूंबियांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने आडगाव येथील वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. नैराश्यातून तसेच नोकरी नसल्याच्या वैफल्यातून हे पाऊल उचलले असल्याचे कुटूंबियांनी सांगितले. दुसरीकडे, किती बळी गेल्यावर शासनाला जाग येणार, असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री तसेच आदिवासी विकास मंत्री यांच्याशी चर्चा करूनही मागण्यांवर तोडगा निघत नसल्याने आता २३ सप्टेंबर रोजी आदिवासी विकास विभाग कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये आदिवासींचे दैवत असलेले पुतळे घेत बिऱ्हाड आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. २१ मे २०२५ रोजीचा शासन आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा, शैक्षणिक सत्र २०२४-२५ मधील कार्यरत वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी यांना रोजंदारी तत्वावर तात्काळ हजर करण्यात यावे, रोजंदारी वर्ग चार कर्मचाऱ्यांचे मृत संवर्गातील पदे जीवित करणे आणि १६ नोव्हेंबर २०२२ चा सुधारित आकृतीबंध रद्द करावा आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहे.