नाशिक – बम बम भोले.. ओम नमो शिवाय, अशा जयघोषात त्र्यंबक नगरीसह संपूर्ण जिल्ह्यातील शिवमंदिरे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी दणाणली. बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी लवकर दर्शन करता यावे, यासाठी रविवारी सायंकाळपासूनच रांगा लागल्या होत्या.
श्रावणात शिव शंकराच्या आराधनेला विशेष महत्व असल्याचे मानले जाते. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाविकांनी त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. विशेष म्हणजे उत्तर भारतात श्रावणाचा समारोप आणि महाराष्ट्रात सुरुवात झाल्याने त्र्यंबक मंदिरात दर्शनासाठी रविवारी सायंकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. सोमवारी पहाटे दोन किलोमीटरपेक्षा दूरवर भाविकांच्या रांगा गेल्या होत्या. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी देवस्थानच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती.
पहाटे चारपासूनच मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. या काळात देवस्थानच्या वतीने नित्यपूजा, अभिषेक, आरती अन्य विधी सुरू राहिले. दुपारी तीननंतर देवस्थानच्या वतीने श्रींचा मुखवटा असलेल्या पालखीची मिरवणूक त्र्यंबक गावातील विविध मार्गावरून काढण्यात आली. कुशावर्त येथे मुखवट्यांला स्नान घालण्यात आल्यावर पालखी मंदिरात आली.
दरम्यान, ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. प्रदक्षिणा मार्गावर सामाजिक संस्था तसेच प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती. रिमझिम सरी अंगावर झेलत भक्तांनी उत्साहात पहिली प्रदक्षिणा पूर्ण केली. पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला होता. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले होते. त्र्यंबक नगरीत शिवपूजेसह इतर काही विधी होत असल्याने श्रावणात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. यंदाही श्रावणाच्या पहिल्या सोमवारी हॉटेल व्यवसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते, खासगी वाहतूक यांच्यासह अन्य व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली.
नाशिक येथे गोदाकाठावर असलेल्या श्री कपालेश्वर मंदिरातही सोमवारी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. ही गर्दी दिवसभर कायम होती. या गर्दीमुळे मंदिराकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. मंदिर परिसरात पूजेच्या सामानासह प्रसादाची दुकाने लागल्याने गर्दीचा खोळंबा झाला. याशिवाय गोदा काठावरील निळकंठेश्वर, सोमेश्वर यासह अन्य शिवमंदिरेही भाविकांच्या गर्दीने फुलली होती. श्रावणी सोमवारनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली होती.
त्र्यंबकेश्वर ऑनलाईन दर्शनपास व्यवस्था बंद
त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाकडून भाविकांना जलद दर्शन घेता यावे, यासाठी धर्मदर्शन रांग वगळता प्रतीव्यक्ती २०० रुपये देणगी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. परंतु, या ऑनलाईन दर्शन पासचा होणारा काळाबाजार पाहता ही व्यवस्था बंद करण्यात आली आहे. पोलीस तपासात अनेक कमतरतेवर बोट ठेवण्यात आले. देवस्थानकडे आधारकार्ड तपासणीचे यंत्र नाही. ऑनलाईन देणगी दर्शन ॲपमध्ये त्रुटी आहेत. त्र्यंबक देवस्थानच्या या बेफिकिरीचा भाविकांना फटका बसला आहे.