सावकारी कायद्यान्वये कारवाई न करण्यासाठी २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना सहकार विभागाचे सहायक निबंधक रणजित पाटील आणि वरिष्ठ लिपिक प्रदीप वीर नारायण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. मागील काही वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

हेही वाचा >>>नाशिक: निवडणुकीसाठी केंद्रस्तरीय समित्या मजबूत करण्यावर भर; नाशिक मध्य मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दाव

काही महिन्यांपूर्वी खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून पाथर्डी फाटा परिसरात एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. नंतर सातपूर येथे तसाच प्रकार घडला. सावकारांच्या त्रासाला वैतागून कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनांनी शहर-ग्रामीण भागात फोफावलेल्या खासगी सावकारीवर प्रकाशझोत पडला. सहकार विभागाला जाग येऊन खासगी सावकारांवर कारवाईचे सत्र सुरू झाले. संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. उपरोक्त लाचखोरीचे धागेदोरे अशाच एका कारवाईशी संबंधित आहे. तक्रारदाराच्या आजोबांवर सावकारी कायद्यान्वये कारवाई केली जाणार होती. या कायद्यान्वये कारवाई न करण्यासाठी सहकारी संस्था (निफाड) कार्यालयातील सहायक निबंधक रणजित पाटील (३२) आणि वरिष्ठ लिपिक प्रदीप वीर नारायण (४५) यांनी २० लाख रुपयांची लाच मागितली. या बाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. मुंबई नाका परिसरात सहाय्यक निबंधक पाटील यांना २० लाख रुपये स्वीकारत असताना पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी पाटील याच्यासह वीर नारायणला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>नाशिक: आम्ही देखील रामभक्त; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शमिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहाळदे आदींच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणूून पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी जबाबदारी सांभाळली. या पथकात पोलीस नाईक प्रवीण महाजन, नितीन कराड, प्रभाकर गवळी यांचा समावेश होता.