नाशिक: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तीन वर्षांचा पदवी शिक्षणक्रम चार वर्षांचा करण्यासाठी नुकतीच एक समिती स्थापन केली असल्याचा निर्णय २६ एप्रिल २०२२ रोजी जाहीर केला आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ नुसार, सध्या सुरू असलेल्या तीन वर्षांच्या शिक्षणक्रमाचे रुपांतर चार वर्षांच्या शिक्षणक्रमात करण्याची योजना आणि याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र या संदर्भात गठित करण्यात आलेल्या समितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला प्रतिनिधीत्व देण्यात आलेले नाही. या समितीमध्ये मुक्त विद्यापीठाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी माणी मुक्त विद्यापीठाचे डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी केली आहे.
राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तीन वर्षांचा पदवी शिक्षणक्रम करण्यासाठी समिती स्थापन केली. या अभ्यासक्रमात एकसमान शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा तयार करणे, सामान्य अध्यापनशास्त्राऐवजी विधायक अध्यापनशास्त्राचा वापर करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी वैयक्तीकृत शिक्षणाचा आराखडा तयार करणे, या चार कारणांसाठी ही समिती स्थापन करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी हे या समितीचे अध्यक्ष असून याच विद्यापीठाचे कुलसचिव समितीचे सदस्य सचिव आहेत.
समितीमध्ये राज्यातील विविध विद्यापीठांमधल्या आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील निरनिराळय़ा विद्याशाखांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, वरिष्ठ सल्लागार यांचा समावेश करण्यात आलेला आहे. एकूण २१ सदस्यांची ही समिती आहे. हे सर्व तज्ज्ञ सदस्य पारंपरिक विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांशी निगडीत आहेत. या समितीमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही.
कोणीही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहू नये अशी सूचना
राज्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ १९८९ पासून कार्य करीत आहे. तत्कालीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक राज्यात एक मुक्त विद्यापीठ स्थापन करत कोणीही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहू नये अशी सूचना करण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठाने या अंतर्गत राज्यात वेगवेगळी अभ्यासकेंद्र सुरू करत शिक्षणापासून दुर असलेल्या व्यक्तींना या प्रवाहात आणण्यात येत आहे. शैक्षणिक क्षेत्रात मुक्त विद्यापीठाने उल्लेखनिय काम केले असतांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तीन वर्षांचा पदवी शिक्षणक्रम चार वर्षांचा करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला कोण-कोणते नवे बदल करणे आवश्यक आहे, हा बदल होत असताना कोणत्या संभाव्य अडचणी येऊ शकतात, त्यावर मार्ग कसा काढता येऊ शकतो, यासारख्या अनेक मुद्दय़ांचा आढावा घेण्यासाठी, त्यावर चर्चा घडून येण्यासाठी या समितीमध्ये मुक्तविद्यापीठाचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे असे वाटते. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने याची दखल घेऊन या समितीमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी डॉ. घोडेस्वार यांनी केली आहे.