लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचे सरकारचे कर्तव्य असते. परंतु, सरकार पळपुटे असल्याने ते इतर राज्यात प्रचाराला गेले, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली. इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. याप्रसंगी त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.

खासदार राऊत यांनी इगतपुरी तालुक्यातील वाघेरे, पाडळी, गोंदे, वाडीव-हे आदी गावातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. अवकाळी पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिस्थिती भीषण आहे. ही परिस्थिती बघून डोळ्यात पाणी आले. भात पीक आणि बागायती पिकाची मोठी हानी झाली असून या वर्षी दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन शेतकऱ्यांकडे नाही. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही सर्व बांधावर जाऊन पाहणी करत आहोत, असे राऊत यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार निर्मला गावित यांनी, उध्दव ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांना खरोखर मदत मिळाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी देखील हे मान्य केले की, ठाकरे सरकारच्या काळातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली. या सरकारच्या काळात मात्र मदत मिळाली नाही. दोन दिवस पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी उदध्वस्त झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत सरकारने जाहीर करावी, अशी मागणी गावित यांनी केली.

आणखी वाचा-‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ विरोधात मालेगावकर आंदोलनाच्या पवित्र्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दौऱ्यात नितीन पानगुडे पाटील, नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, तालुका प्रमुख भगवान आडोळे आदी उपस्थित होते.