नाशिक – मानवतावादी लोककवी, लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचे सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील स्मारकाचे काम सुमारे १७ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. दुर्लक्षामुळे जे थोडेफोर काम झाले होते, त्याची अत्यंत दुर्देशा झाली आहे. वामनदादांचे सध्या शतकोत्तर जन्मशताब्दी वर्ष सुरु असून किमान या वर्षात तरी स्मारकाचे काम पूर्ण होईल काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
लोकशाहीर वामनदादा कर्डक देशवंडी येथील भूमिपुत्र. देशवंडीत त्यांच्या स्मारकाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. सुशोभिकरण तसेच स्मारक म्हणून ज्या गोष्टी अभिप्रेत असतात, त्या सर्वांची पूर्तता करावी, यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना निवेदन देण्यात आले आहे. लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिकचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा. शरद शेजवळ हे या स्मारकासाठी कित्येक वर्षांपासून लढा देत आहेत. शासन आणि प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करुनही त्यांच्या तक्रारीची नोंद घेण्यात आलेली नाही.
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे १५ ऑगस्ट १९२२ रोजी लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म झाला. आपल्या शाहिरीतून, काव्यातून संपूर्ण जगाला मानवतावादी संदेश देणारा लोककवी आपल्या गावात जन्मास यावा, ही खरेतर देशवंडीवासीय आणि नाशिक जिल्ह्यासाठीही अभिमानाची गोष्ट. परंतु, वामनदादांचे कार्य शासनासह सत्ताधाऱ्यांकडून कायमच दुर्लक्षित राहिले. आंबेडकरी जनतेच्या मागणीनुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देशवंडीत त्यांच्या स्मारकचा काम सुरु करण्यात आले. परंतु, त्यावेळी मंजूर झालेल्या निधीत जागेला कुंपण, काही ओटे, असे थोडेफार काम झाले. नंतर स्मारकासाठी निधी मंजूर करण्यात न आल्याने त्याची सध्या अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मुळात स्मारकाचे काम सुरु करुन सुमारे १७ वर्षे झाली आहेत.
अनेक वर्षांपासून स्मारकाचे सुशोभिकरण बाकी आहे. स्मारक म्हणून अपेक्षित असलेल्या कोणत्याही सुविधा किंवा स्मारकास साजेशे असे वास्तुरूप त्यास किंचितही देण्यात आलेले नाही. सध्या लोककवी वामनदादा कर्डक यांचे शतकोत्तर जन्मशताब्दी वर्ष सुरू असून हे वर्ष संविधान शाहिरी वर्ष म्हणून साजरे करण्यात यावे आणि शासनाने स्मारकाच्या कामाकडे तत्काळ लक्ष देवून स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण करावे, अशी आंबेडकरी जनतेची मागणी आहे.
देशवंडी ग्रामपंचायत हद्दीत ०.५३ गुंठे क्षेत्र २००७-०८ या वर्षी वामनदादांच्या स्मारकासाठी मंजूर करण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने १६ लाख रुपये मंजूर केले होते. त्यानंतर स्मारकचा काम सुरुही करण्यात आले. परंतु, अंतर्गत सुशोभिकरण, बांधकाम तसेच अन्य कोणत्याही सुविधा अद्यापही करण्यात आलेल्या नाहीत. सुमारे १८ वर्षांपासून हे स्मारक लोककवी वामनदादा कर्डक यांच्या शतकोत्तर जन्मशताब्दी वर्षातही भग्नावस्थेत आहे. या ठिकाणी झाडेझुडपे, गवत उगवले आहे. लोकभावनेची कदर करुन या स्मारकाचे अपूर्ण राहिलेले काम त्वरीत पूर्ण करण्याची मागणी वामनदादाप्रेमींची आहे.
लोककवी वामनदादा कर्डक यांचे स्मारक पूर्ण व्हावे, यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. परंतु, मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वामनदादांचे हे शतकोत्तर जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. या वर्षात तरी स्मारकाचे काम पूर्ण व्हावे. – प्रा. शरद शेजवळ (संस्थापक कार्याध्यक्ष, लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिक).