नाशिक : शहरात अनेक भागात कमी दाबाने, अपुरा पाणी पुरवठा होत असल्याच्या कारणास्तव आंदोलनातून महापालिकेला जनक्षोभाला तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे डिसुझा कॉलनीसारख्या उच्चभ्रू भागात मात्र इमारतीतील पाण्याच्या टाक्या ओसंडून वाहतात. दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. परंतु, त्याकडे ना रहिवाशांचे लक्ष आहे, ना पाणी पुरवठा विभागाचे.
यंदा प्रारंभीच्या काळात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि मुकणे धरणात समाधानकारक जलसाठा झाला. धरणे तुडूंब असतानाही अनेक भागात पाणी पुरवठ्यात अडचणी येत आहेत. ऐन पावसाळ्यात टंचाई भेडसावत असताना मनपा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार करीत मनसेच्यावतीने अलीकडेच महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला होता. विस्कळीत पाणी पुरवठ्यावरून राजकीय पक्ष व संघटनांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतलेली आहे.
पाणी पुरवठ्याचा प्रश्न इतका गंभीर झाला की, आमदार सिमा हिरे यांच्या पाठपुराव्यामुळे मध्यंतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खास बैठक घ्यावी लागली होती. या परिस्थितीत कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनीसारख्या भागात काही उच्चभू रहिवाशांना त्याचे कुठलेही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. पाण्याच्या होणाऱ्या अपव्ययाबद्दल जागरुक नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
रहिवाशांची अनास्था
कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनीत गोदा गौरव इमारतीत हा प्रकार दररोज घडतो. या इमारतीचा व्यावसायिक व निवासी अशा दोन्ही कारणांस्तव वापर केला जातो. इमारतीवरील तुडूंब झालेली पाण्याची टाकी दोन ते तीन तास ओसंडून वाहते. टाकीचे नळ बंद करण्याची तसदी घेतली जात नाही. परिणामी, दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते, अशी तक्रार होत आहे. असे प्रकार उच्चभ्रू वसाहतीतील अन्य ठिकाणी घडत असल्याची साशंकता व्यक्त केली जाते.
महापालिकेची डोळेझाक
उन्हाळ्यात धरणे रिक्त होण्याच्या मार्गावर असताना म्हणजे टंचाईच्या काळात महानगरपालिका पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारते. किमान तसा इशारा देते. इमारतीतील टाक्या ओसंडून अपव्यय होऊ नये तसेच पिण्याचे पाणी अन्य कारणांस्तव वापरण्यास प्रतिबंध केला जातो. पावसाळा सुरू झाला की, मनपा प्रशासन निद्रिस्थ अवस्थेत जाते, असा नागरिकांचा आक्षेप आहे. कारण, डिसुझा कॉलनीसारख्या भागातील इमारतीत पाण्याच्या टाक्या कित्येक तास ओसांडून वाहतात. त्याकडे मनपाच्या पाणी पुरवठ्याने दुर्लक्ष केल्याची जागरूक नागरिकांची तक्रार आहे. अनेक भागातील रहिवासी पाण्यासाठी तिष्ठत असताना उच्चभ्रू वसाहतीत पाण्याचा खुलेआम अपव्यय केला जातो. आणि महापालिका डोळेझाक करते असे त्यांचे म्हणणे आहे.