नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीत शंभर प्लसची घोषणा करुन त्यासाठी महायुतीतील मित्रपक्ष भाजप कार्यरत झाला असताना आता नाशिक शहरात आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वत : उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते एकनाथ शिंदे मैदानात उतरत आहेत. शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे रविवारी कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यातून एकनाथ शिंदे शिवसैनिकांना कोणता मंत्र देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून सुरु झाली आहे. शिवसेनेने (उध्दव ठाकरे) घेतलेला मेळावा, राष्ट्रवादीने (शरद पवार) आयोजित केलेले शिबीर आणि भाजपकडून नाशिकची जबाबदारी सांभाळणारे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून वेळोवेळी घेण्यात येत असलेल्या बैठका, याव्दारे निवडणूक तयारीविषयी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तयार केले जात आहे. भाजपने तर शंभर प्लसची घोषणा केली आहे.
भाजपने त्यादृष्टीने महाविकास आघाडीतील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्याचा सपाटाच लावला होता. त्यामुळे भाजपमध्ये आता महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या प्रमाणाबाहेर झाली आहे. इतर पक्षांमधून आलेल्यांमुळे आपली संधी हुकेल की काय, ही शंका भाजपच्या निष्ठावंतांना भेडसावू लागली आहे. भाजपमध्ये इतर पक्षांमधून प्रवेश करणाऱ्यांमध्ये काही वादग्रस्त माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने आधीच भाजमधील जुने कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज आहेत. परंतु, उघडपणे नाराजी व्यक्त करता येत नसल्याने त्यांच्यात अस्वस्थता आहे.
या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी महायुतीतील भाजपचा मित्रपक्ष असलेला शिवसेना (एकनाथ शिंदे) सावधपणे एकेक पाऊल टाकत आहे. भाजप नव्हे तर, ठाकरे गट हाच आपला राजकीय शत्रू असल्याचे शिंदे गट मानत असला तरी भाजपने स्वबळाचा निर्धार केल्यास नाईलाज म्हणून शिंदे गटालाही स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी लागेल. त्यामुळे गाफील न राहता तयारीत राहण्यासाठी एकनाथ शिंदे स्वत: मार्गदर्शनासाठी नाशिकमध्ये येत आहेत. महापालिकेच्या १२२ जागांपैकी अधिकाधिक जागा जिंकून भाजपला शह देण्याचा प्रयत्न करता येईल काय, यादृष्टीनेही शिंदे गटाकडून प्रयत्न होतील.
नाशिकमधील वाढती गुन्हेगारी, खड्डेमय रस्ते या दोन प्रमुख समस्यांमुळे नाशिककर हैराण झाले असल्याने भाजपचे तीनही आमदारही त्यामुळे आता या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून पोलीस आयुक्तांपर्यंत फेऱ्या मारु लागले आहेत. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी आधीच गुन्हेगारीच्या विषयावरुन पोलीस आयुक्तांची भेट घेऊन भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही पक्षांमधील शह-काटशहचे राजकारण अधिकच रंगण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ठाकरे गट आणि मनसे हे शहरातील गुन्हेगारी हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवतील, हे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे हेही गुन्हेगारीचा विषय मांडतात काय, हे पाहणे मह्तवपूर्ण ठरणार आहे.