संतोष जाधव

नवी मुंबई शहरातही करोनाचा कहर सुरुच असून प्रत्येक दिवसागणिक रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. पालिकाक्षेत्रातील करोना रुग्णांची संख्या सतराशेच्या पार गेली आहे. तर दुसरीकडे खासगी प्रयोगशाळांच्या करोना तपासणी अहवालांबाबत साशंकता निर्माण झाली आहे, त्यामुळे शहरातील एका प्रयोगशाळेला पालिकेने नोटीस बजावली आहे.

नवी मुंबई शहरात करोना संशयितांचे स्वॅब घेतल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून ते करोना चाचणीसाठी जे. जे. रुग्णालयात पाठवले जातात. परंतू, वाढत्या रुग्णसंख्येमुळं जे. जे. रुग्णालयातून करोना अहवाल प्राप्त होण्यासाठी विलंब होत आहे. पालिकेमार्फत केवळ लक्षणं असणाऱ्या रुग्णांची करोनाची चाचणी मोफत केली जाते. तर खासगी प्रयोगशाळांमध्ये याच चाचणीसाठी ४,५०० रुपये मोजावे लागतात. नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांच्याकडून चार खासगी प्रयोगशाळांना करोना चाचण्या करण्याची परवानगी दिली आहे. परंतू, या खासगी प्रयोगशाळांमधून केल्या जाणाऱ्या चाचण्यांबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातही खासगी प्रयोगशाळांमधून सदोष निष्कर्ष काढले जात असल्याचा प्रकार समोर आल्याने स्थानिक स्वराज्य संस्था सावधानता बाळगत आहे.

नवी मुंबई शहरातही करोनाच्या चाचणी अहवालाबाबत पालिका आरोग्य विभागांमध्ये साशंकता व्यक्त केली जात असून करोना चाचण्या पॉझिटिव्ह दाखवल्या जात असल्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ज्या रुग्णांना कोविडची लक्षणे आहेत अशांचीच चाचणी करावी असे स्पष्ट निर्देश आहेत. परंतू, हे नियम कितपत पाळले जातात याबाबतही शंका व्यक्त करण्यात येत आहे. मुळातच करोनाच्याबाबत नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण असून भीतीपोटी नागरिक ४,५०० रुपये देऊन चाचणी करुन घेत आहेत. मात्र, त्यांच्या अहवालांबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाकडूनच संशय व्यक्त होत असल्याने भरमसाठ पैसे देऊनही नागरिकांच्या जीवाशी खेळ होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नेमकं घडलं काय?

शासनाने मान्यता दिलेल्या एका खासगी प्रयोगशाळेत एका रुग्णाची तपासणी करण्यात आली. पहिल्या दिवशी चाचणी अहवाल निगेटिव्ह देण्यात आला. त्यामुळे या रुग्णाला वाशी सेक्टर ११ येथे स्थलांतरीत करण्यात आले. त्यानंतर तेथील रुग्णालयानेही या रुग्णाचा स्वॅब चाचणीसाठी एका खासगी प्रयोगशाळेत पाठवला तर त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह दाखवण्यात आला. दरम्यान, या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आधी अहवाल निगेटिव्ह व नंतर दुसऱ्याच दिवशी पॉझिटिव्ह आल्यामुळे संशयास्पद वातावरण निर्माण झाले असून पालिकेने संबंधित प्रयोगशाळेला नोटीस बजावली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सरकारमान्य असलेल्या खासगी प्रयोगशाळांमधील दोन दिवसातील एकाच रुग्णाचे अहवाल विसंगत आल्यामुळे संबंधित थायरोकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड यांना नोटीस बजावण्यात आली असून संबंधित प्रयोगशाळेला पालिकाक्षेत्रात तपासणी करण्यास बंदी घालावी असे पत्र आयसीएमआरला देण्यात येणार आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.