News Flash

कचरा टाकायचा कुठे?

गतवर्षीच लाखो रुपये खर्च करून अतिशय मजबूत कचराकुंडय़ासाठी शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या.

नवी मुंबईत ६००च्या आसपास कचराकुंडय़ा आहेत.

घंटागाडीच्या वेळा गैरसोयीच्या असल्यामुळे नोकरदार हवालदिल; कचराकुंडय़ाही हटवल्या

नवी मुंबई : नवी मुंबई पालिका क्षेत्रातील कचराकुंडय़ा टप्प्याटप्प्याने हटवण्यात येणार असून घंटागाडीची संकल्पना पुन्हा एकदा राबवण्यात येणार आहे. या पूर्वीही ही संकल्पना राबविण्याचा प्रयत्न महापालिकेने केला होता, मात्र त्याला यश आले नाही, तरीही पुन्हा एकदा सुमारे १५० कचराकुंडय़ा हटवण्यात आल्या आहेत. मात्र नोकरदार व्यक्ती कामाला गेल्यानंतर घंटागाडी येत असल्यामुळे कचरा कुठे टाकावा, असा प्रश्न गावठाण भागात राहणाऱ्यांना पडला आहे. ते सध्या रस्त्यालगतच्या छोटय़ा डब्यांत कचरा टाकत आहेत, त्यामुळे ते डबे भरून कचरा बाहेर पडू लागला आहे.

नवी मुंबईत ६००च्या आसपास कचराकुंडय़ा आहेत. सध्या पालिका प्रशासन शहर कचराकुंडीमुक्त करण्याच्या प्रयत्नात आहे. हा शहरस्वच्छता मोहिमेचाच एक भाग असल्याचे सांगितले जाते. महिनाभरात सुमारे दीडशेच्या आसपास कचराकुंडय़ा हटवण्यात आल्या आहेत. ही संकल्पना सुमारे आठ वर्षांपूर्वी राबविण्यात आली होती, मात्र त्यामुळे जागोजागी कचरा पडत होताच, शिवाय घंटागाडीच्या वेळाही सांभाळण्यात प्रशासनाला अपयश आले होते.

गतवर्षीच लाखो रुपये खर्च करून अतिशय मजबूत कचराकुंडय़ासाठी शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. एका वर्षांतच कचराकुंडीमुक्त शहर मोहीम सुरू करण्यात आल्याने पालिकेकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याची टीका होत आहे. कचराकुंडय़ा हटवल्याने सर्वाधिक त्रास माथाडी वस्ती आणि गावठाण भागात राहणाऱ्या रहिवाशांना होत आहे. सोसायटय़ांमध्ये सुरक्षारक्षक असतो तो सोसायटीतील लोकांनी गोळा केलेला कचरा घंटागाडी कर्मचाऱ्यांना देतो, मात्र गावठाण आणि माथाडी वस्तीत अशा प्रकारे कचरा साठवून देण्यासाठी कोणीही नसते. नोकरी करणारे सकाळी लवकरच कामानिमित्त बाहेर पडतात तर मुले शाळेत जातात, त्यामुळे घंटागाडीच्या वेळेत कचरा टाकला जात नाही अनेकदा घंटागाडीची वेळाही चुकत असल्याने कचरा घरातच ठेवावा लागतो.

अनेकांनी रस्त्यावर ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्यांमध्ये (गार्बेज बिन) कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जे डबे भरण्यास किमान चार ते पाच दिवस लागतात ते आता दर दोन तासांनी भरत आहेत.

कचराकुंडीमुक्त शहर संकल्पना राबविली जात आहे. घंटागाडीतच कचरा टाकण्याचे आवाहन केले आहे. गल्लीबोळांत छोटय़ा घंटा गाडय़ाही पाठवण्यात येतात. घंटागाडी येण्याची वेळ जाणून घेण्यासाठी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

– तुषार पवार, उपायुक्त, घनकचरा विभाग

घंटा गाडी येण्याच्या वेळेत आम्ही कोणीही घरात नसतो. आमच्यासारखे अनेक जण आहेत जे नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी सकाळी लवकर घराबाहेर पडतात आणि घंटा गाडीची वेळ पाळू शकत नाही. त्यांच्यासाठी पालिकेने यावर काही तरी उपाय करावा.

– मनीषा जाधव, रहिवासी, कोपरखैरणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 4:03 am

Web Title: garbage problems in navi mumbai
Next Stories
1 शीव-पनवेल महामार्गावरील प्रवाशांना तूर्तास दिलासा
2 भर पावसात ‘मायक्रो-सरफेसिंग’ची मात्रा पामबीचला लागू
3 पनवेलमध्ये साथींचे सावट
Just Now!
X