अडवली-भुतवली, बेलापूर, खारघर परिसरांतील घटना; अग्निशमन दल, पोलिसांकडून बचावकार्य
नवी मुंबई : नवी मुंबईत तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने अनेक पर्यटकांनी परिसरातील पर्यटनस्थळी गर्दी केली. पाण्याचा अंदाज न आल्याने काही अतिउत्साही पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी अडकले होते. अग्निशमन दल आणि पोलिसांनी बचावकार्य करून ४८६ पर्यटकांची सुटका केली.

महापेजवळील अडवली-भुतवली परिसरात असलेल्या डोंगरावर जवळपास १०० पर्यटक पावसाचा आंनद घेण्यासाठी गेले होते. जोरदार पावसाने या परिसरातील डोंगररांगांतून येणाऱ्या प्रवाहापलीकडे ते अडकले होते. नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागाने त्यांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पांडवकडा धबधब्यावर असलेल्या बंदीमुळे अनेक जण बेलापूर सेक्टर ८ परिसरामागील डोंगररांगांमध्ये पावसाची मजा घेण्यासाठी गेले होते; परंतु पावसाचा जोर वाढल्याने २७५ जण डोंगररांगांमधून वाहणाऱ्या प्रवाहापलीकडे अडकले होते. त्यांनाही नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभाग व स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य करून सुखरूप बाहेर काढले, तर खारघर येथील डोंगरभागात वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या १११ जणांना सिडको अग्निशमन विभाग आणि नवी मुंबई पोलिसांनी बाहेर काढले, अशी माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. येथील धबधब्यावर ते अडकले होते.

नवी मुंबई शहरातील अडवली-भुतवली व सीबीडी सेक्टर ८ परिसरात अनेक पर्यटकांना पालिकेच्या अग्निशमन विभागाने सुखरूप बाहेर काढले; परंतु प्रत्येकानेच करोनाचे गांभीर्य ओळखून आपल्या जिवाची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

– शिरीष आरदवाड, उपायुक्त, नवी मुंबई महापालिका अग्निशमन विभाग