मुखपट्टी न वापरल्याने सव्वा कोटीचादंड; ३१ दक्षता पथकांकडून कारवाई

नवी मुंबई : महामुंबईतील करोना रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेत झपाटय़ाने वाढत असून नवी मुंबईकर मात्र बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. मुखपट्टी न वापरल्याने सव्वाकोटींपेक्षा जास्त दंड वसूल केला गेला आहे तर सुरक्षा अंतराचे भान ठेवले जात नसल्याचे एपीएमसी, रेल्वे, बाजार, मॉल्स येथील गर्दीवरुन स्पष्ट दिसून येत आहे.

त्यामुळे महिनाअखेर पालिकेला स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागेल अशी पालिका वर्तुळात चर्चा आहे.

गेल्या वर्षी आठ मार्चला नवी मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून शहरात करोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये करोना गेल्यासारखे चित्र निर्माण झाल्याने सर्व व्यवहार वेगाने सुरू झाले. नवी मुंबईत संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्राला अन्नधान्य, भाजी, फळे पुरवठा करणारी एपीएमसी बाजारपेठ असून याच ठिकाणाहून गेल्या वर्षी रुग्णवाढीचा संख्या दिसून आलेली आहे. कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता येथील व्यापार सुरू असल्याने अनेक व्यापारी व माथाडींना जीव गमवावा लागला होता.

यंदा एपीएमसीत उपाययोजना दिसून येत असल्या तरी बेफिकीरपणा जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबईत सध्या चारशेच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. विविध ठिकाणी तपासणी केल्याने ही संख्या वाढत असल्याचेही चर्चा आहे, मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याची सत्य स्थिती पालिका नाकारत नाही. त्यामुळे विविध उपाययोजना केल्या जात असून त्यांना नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून आले आहे.

राज्य शासन व पालिका प्रशासनाने घातलेले निर्बंधपाळले जात नसल्याचे दिसत आहे. शहरात गर्दीची अनेक ठिकाणी दिसून येत असल्याने सुरक्षा अंतराचा फज्जा उडालेला आहे. मुखपट्टीसारख्या उपाययोजनेलाही तिलांजली दिली जात असून सव्वाकोटींपेक्षा जास्त दंड या मुखपट्टी न वापरणाऱ्यांकडून वसूल केला जात आहे. याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांची सख्याही लक्षवेधी आहे. जंतुनाशके वापरुन वारंवार हात धुण्याची सवय देखील कमी झाली असल्याचे निरीक्षण असून कुठे आहे करोना असा सवाल तरुणाई करीत आहे.

पालिका क्षेत्रातील ही संख्या अशाच प्रकारे वाढत राहिल्यास कमी रुग्णसंख्या असताना टाळेबंदी करून त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रशासन प्रस्ताव तयार करीत आहे. रात्रीच्या संचारबंदीचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.

तीन दिवसांत ११२० जणांवर कारवाई

शहरात ३१ दक्षता पथके नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करीत असून फक्त तीन दिवसांत ११२० जणांवर कारवाई करत ३ लाख ४८ हजारांचा दंड वसूल केला आहे. तर १० ऑगस्टपासून ३१ हजार ३६४ जणांवरील कारवाईत १ कोटी ३३ लाखाचा दंड वसूल केला आहे.