|| शेखर हंप्रस

अकरा महिन्यांत प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या सूचना :- पारसिक हिल येथून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असताना आता या नाल्यावरून प्रदूषण मंडळ व पालिका प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाले आहेत. प्रदूषण मंडळाने केलेल्या अभ्यासात येथील झोडपट्टीतील सांडपाण्यामुळे नाला प्रदूषित होत असल्याचे समोर आल्याने त्यांनी पालिका प्रशासनाला यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तर पालिका प्रशासनाने सांडपाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत असल्याचा दावा करीत हा आरोप फेटाळला आहे.

पारसिक हिल या डोंगर रांगेतून एक नैसर्गिक नाला वाहतो. तो पुढे पावणे एमआयडीसी, पावणे गाव, कोपरखैरणे येथून पुढे खाडीला मिळतो. एमआयडीसीतील कंपन्यांतील रासायनिक पाणी प्रक्रिया न करता या नाल्यात सोडले जाते. यामुळे हा नाला   नेहमी दरुगधी ओकत असतो. त्याचा नाला परिसरातील नागरिकांना व वाहनचालकांना मोठा त्रास होत असतो. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे.

याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळावर वारंवार टीका होत  असते. दरम्यान, या समस्येचा नुकताच प्रदूषण नियंत्रण मंडळाने अभ्यास केला. यात कंपन्यांच्या रासायनिक पाण्याबरोबरच येथील झोपडपट्टीतील सांडपाणीही कारणीभूत असल्याचे त्यांच्या पाहणीत समोर आले आहे.

त्यामुळे मंडळाने कंपन्यांमुळे होत असलेल्या नाला प्रदूषणावर उपाययोजना सुरू केल्याचा दावा करीत नवी मुंबई महापालिकेला येथील झोपडपट्टीतील सांडपाणी थेट नाल्यात न सोडता, त्यावर प्रक्रिया करून सोडण्यात यावे अशा सूचना करीत येथे यासाठी पुढील अकरा महिन्यांत येथे यासाठी प्रकल्प उभारावा असे कळविले आहे.

रासायनिक कंपन्यांचे पाणी रात्रीच्या अंधारात सोडले जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळी उग्र वास येतो. झोपडपट्टीतील सांडपाण्यापासून हे होणे अशक्य आहे. कंपन्यांचे प्रदूषण रोखण्यास अपयश येत असल्याने प्रदूषण मंडळ हा कांगावा करीत असल्याचा आरोप पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.

रासायनिक पाण्याच्या जलवाहिनीला गळती

येथील रासायनिक कंपन्यांचे प्रक्रिया केलेले पाणी थेट एमआयडीसी ते वाशी खाडी पूल अशी जलवाहिनी टाकलेली आहे. हे पाणी खाडीत खोलपर्यंत सोडण्यात येते, मात्र या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्याचेही पाणी नाल्यात मिसळले जाते. त्यामुळेही नाला प्रदूषित होत आहे. याबाबत जलवाहिनी दुरुस्ती वा नूतनीकरण करावे, अशा सूचना एमआयडीसी प्रदूषण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. यावर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एम.एस.कलकुटकी यांनी जलवाहिनी जुनी झाल्याने काही ठिकाणी गळती होत आहे, ती बदलण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामास सुरुवात होणार असल्याचे सांगितले.

झोपडपट्टीतील पाण्यावर प्रक्रिया न करताच थेट नाल्यात सोडले जात आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेला सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार ११ महिन्यात प्रक्रिया केंद्र उभारणी करावी, अन्यथा कायद्यानुसार रोज दंड आकारणी केली जाईल. – अनंत हर्षवर्धन, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

झोपडपट्टीत मलनिस्सारण वाहिन्यांना जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे सांडपाणी नाल्यात सोडले म्हणून प्रदूषण होते हे न पटण्यासारखे आहे.  आमचे काम योग्य पद्धतीन व नियमानुसार करत आहोत. त्यामुळे प्रकल्प उभारण्याचा प्रश्नच नाही.- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका