विष्णुदास भावे नाटय़गृहातील कार्यशाळेत विद्यार्थी-पालकांच्या विविध शंकांचे निरसन

सर्वोत्तम करिअरचा ध्यास घेऊन शिक्षणाची धुळाक्षरे गिरवणाऱ्या जिज्ञासू विद्यार्थ्यांची पावले शुक्रवारी सकाळी वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहाच्या दिशेने वळली आणि योग्य मार्गदर्शनासाठीचा शोध संपला. विद्यार्थी आणि पालकांनी तुडुंब भरलेल्या भावे नाटय़गृहात दहावी-बारावीनंतर पुढे काय, या सतावणाऱ्या प्रश्नाचे अचूक उत्तर मिळाले. सकाळी ९.३० वाजता सुरू झालेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमाला आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हाती काही तरी गवसल्याचा आनंद झळकत होता.

‘नीट’ परीक्षेची तयारी कशी करायची? या परीक्षेतील आव्हाने यावरून निर्माण झालेला गोंधळ निवारण्यासाठी योग्य मार्गदर्शनासाठी ‘मार्ग यशाचा’ कार्यक्रमात तज्ज्ञांना बोलावण्यात आले होते. सकाळी पालकांसोबत काही विद्यार्थी कार्यक्रमस्थळी हजर झाले. बघता बघता नाटय़गृह परिसर विद्यार्थी आणि पालकांनी फुलून गेला. महाविद्यालयात प्रवेशासाठी होणारी लगबग आणि आत योग्य जागा पटकावण्यासाठी विद्यार्थी प्रयत्नात होते. प्रवेशासाठी विद्यार्थी रांगेत उभे होते. काही वेळाने ही रांग नाटय़गृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर गेली होती. प्रवेशाचे सोपस्कार आटोपल्यानंतर विद्यार्थी आसनस्थ झाले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ठाणे, पनवेल, उरण आणि नवी मुंबई येथून विद्यार्थी आणि पालक मोठय़ा संख्येने आले होते.

कार्यक्रमाला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या व्याख्यानाने सुरुवात झाली. विद्यार्थी आणि पालक एकाग्रतेने करीअरविषयक मार्गदर्शन ऐकत होते. या वेळी काही विद्यार्थ्यांनी वक्त्यांकडून अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांना गाठून शंकांचे निरासन करून घेतले. वक्त्यांनी विविध सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यशाचे गमक गवसले!

या कार्यक्रमातून करिअरच्या नव्या वाटा उमगल्या. ‘लोकसत्ता’चा हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. भविष्यातही अशा कार्यशाळा विद्यार्थ्यांना खूप उपयोगी पडतील. करिअरचा खरा अर्थ या कार्यक्रमात कळाला. समाजमाध्यमांपासून मुलांना लांब ठेवणे आवश्यक, हा मूलमंत्रही यातून मिळाला.

– रंजना रोडे,  पालक

कोणत्या शैक्षणिक बाजूकडे कल असायला हवा, हे या कार्यक्रमातून कळाले. पदवी शिक्षणानंतरही काय करावे याचे मार्गदर्शन अशा कार्यक्रमातून व्हावे.

– नम्रता हिंगणे , पालक

बारावीनंतर सीए आणि सीएस या अभ्यासक्रमाबाबत मिळालेली माहिती मला खूप महत्त्वाची आहे. उच्च शिक्षणाचे फायदे-तोटे कळाल्याने मला आता पुढी वाटचालीसाठल खूप उपयोग होईल.

– मानसी बोऱ्हाडे, विद्यार्थिनी

मला पायलट व्हायचे आहे. विवेक वेलणकर यांनी केलेले मार्गदर्शन हे मला उपयोगी ठरेल. आता मला स्वत:च्या आवडीच्या विषयात करिअर करायची संधी मिळेल, याचा आत्मविश्वास वाटला.

– वरुण पाटील, विद्यार्थी    

खरंच खूप छान उपक्रम ‘लोकसत्ता’ राबवत आहे. कार्यक्रमात अनुभव त्यांच्या करअिरचा प्रवास एकूण फार छान वाटले. मला करिअरबद्दल मार्गदर्शन माहिती मिळून करिअर निवडण्यासाठी यांचा फायदा झाला.

– सायली आघाव, विद्यार्थिनी

अत्यंत सोप्या भाषेत काय करावे, याबद्दल मार्गदर्शन मिळाले. डॉ. नाडकर्णी यांचे मार्गदर्शन तर अमूल्यच. संकुचित विचारपद्धतीचा त्याग करून समूह भावनेने काम करणे आवश्यक आहे, हा त्यांचा सल्ला योग्य वाटला. विवेक वेलणकर यांच्या मार्गदर्शनातून विज्ञान शाखेबद्दलची माहिती मिळाली.

– सागर कांबळे, विद्यार्थी