नवी मुंबई : शहरात लसीकरणाला नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत ८२ हजार ४७० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. पालिकेची क्षमता दिवसाला दहा हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची असताना केवळ ३५०० ते ४००० नागरिक लसीकरण करून घेत आहेत.

पालिकेने करोना लसीकरणालादेखील प्राधान्य दिले असून ४१ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आता ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहेत. यात इतर आजार असलेल्या रुग्णांना प्राधान्य दिले जात आहे, मात्र पालिकेची दिवसाला दहा हजार मात्रा देण्याची तयारी असताना केवळ साडेतीन चार हजार नागरिक लसीकरण करून घेत आहेत. त्यामुळे सरसकट सर्वाना लसीकरण करण्यात यावे, असे आरोग्य यंत्रणेतील डॉक्टरांचे मत आहे. लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम असून लस घ्यावी की नाही याबाबत दुमत आहे. लसीकरण झाल्यानंतरही करोना होत असल्याने लसीकरण करून उपयोग काय,

असा सवाल उपस्थित केला जात आहे, पण लस घेण्यास कोणतीही हरकत नसल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे.

जम्बो केंद्र कामगार रुग्णालयात

जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यात यावी यासाठी पालिका प्रशासनाने निर्यातभवन येथे गेल्या आठवडय़ात जम्बो लसीकरण केंद्र उभारले होते. मात्र निर्यातभवन हे करोना केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील जम्बो लसीकरण केंद्र आता वाशीतील कामगार रुग्णालयात हलविण्यात आले असून शुक्रवारपासून ते कार्यान्वित करण्यात आले आहे.

नाकेबंदीही करणार

साथरोग नियंत्रण कायदा १८९७ नुसार पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. यासाठी संध्याकाळनंतर विनाकारण भटकणाऱ्या तरुणाई, नागरिकांना नाकाबंदीला तोंड द्यावे लागणार आहे. शनिवारपासून लागणाऱ्या लागोपाठ सुट्टय़ाचे बेत आखले जात असून या सहल बहाद्दरांना नाकाबंदीला सामोरे जावे लागणार आहे.