गाडी धुण्याच्या बहाण्याने चावी घेऊन वाहने लंपास

नवी मुंबई भर रस्त्यात किंवा पार्क केलेली वाहने नकली चावी बनवून चोरण्याचे प्रकार आता कालबाह्य़ झाल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी बडय़ा गृहनिर्माण सहकारी संस्थांमधील वाहने रीतसर चावी घेऊन लंपास करण्याची एक नवीन शक्कल वाहन चोरटय़ांनी शोधून काढली आहे. वाहन धुण्याच्या बहाण्याने येऊन घरातून रीतसर चावी घेऊन ही चोरी केली जात आहे. नेरुळ येथील पामबीच रेसिडेन्सीमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून पोलीस तपास करीत आहेत. मात्र अद्याप चोर हाती लागलेले नाहीत.

घणसोली येथील रिलायन्स उद्योग समूहाच्या कंपनीत देवेंद्र हालवर हे अधिकारी आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी नवीन इनोव्हा क्रिस्टा ही १७ लाख रुपये किमतीचे वाहन खरेदी केले. हालवर यांना दर शनिवार रविवारी सुट्टी असते. पामबीच मार्गावरील सर्वात मोठी सोसायटी असलेल्या पामबीच रेसिडेन्सीमध्ये नियमित वाहन धुण्यासाठी रोहित नावाचा मुलगा दररोज येतो. त्यामुळे हालवर यांनी आपली गाडी धुण्याचे मासिक काम या मुलाकडे सोपविले होते. सर्वसाधारपणे सुट्टीच्या दिवशी गाडय़ा धुणारी मुले गाडय़ा ह्य़ा आतून बाहेरून धूत असतात. एरवी ही वाहने बाहेरून धुतली जातात. या रविवारी हालवर यांच्या घरी गाडी धुण्यासाठी नियमित येणाऱ्या मुलाऐवजी राजन नावाच्या तरुणाने गाडी धुण्यासाठी चावी मागितली. नियमित येणारा मुलगा गावी गेल्याने त्याच्या बदल्यात आपण आल्याचे त्याने सांगितले. हालवर यांची पत्नी ललिता यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून इनोव्हा गाडीची चावी दिली. जेमतेम आतून बाहेरून गाडी धुणारा मुलगा एक ते दीड तासाने चावी आणून देत असल्याने जास्त वेळ झाल्यानंतरही गाडीची चावी परत न आल्याने हालवर सोसायटीतील पार्किंगच्या जागी गेले असता तेथील गाडी गायब असल्याचे आढळून आले. त्यावेळी नियमित गाडीची साफसफाई करणाऱ्या मुलाला फोन करून विचारले असता आपण कोणीही बदली कामगार पाठविला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हालवर यांची नवीन गाडी घरातून चावी मागून लंपास केल्याचे दिसून आले. गाडी चोरण्याची ही एक नवीन पद्धत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अनोळखीची खात्री करा

सोसायटीच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यात ही गाडी चोरीला गेल्याचे दिसून येत आहे, पण पोलीस या चोरांचा अद्याप तपास लावू शकलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या गाडीची चावी अनोळखी धुणाऱ्यांना देण्याअगोदर पूर्ण खात्री करून घ्यावी असे पोलिसांनी आवाहन केले आहे.