News Flash

एनएमएमटी आगारांचा व्यावसायिक विकास

वर्षभरात या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

 

वाशी, सीबीडी, रबाळेत कार्यालये, दुकानांना जागा देणार

शहरातील एनएमएमटीच्या तीन आगारांचा बेंगळुरु शहराच्या धर्तीवर व्यावसायिक विकास करण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने घेतला आहे. लवकरच या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. वर्षभरात या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. या तीन प्रकल्पांमुळे तोटय़ात जाणारा परिवहन उपक्रम नफ्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सिडकोची बीएमटीसी बस योजना बंद पडल्यानंतर एसटी व बेस्टवर सर्वस्वी अवलंबून असणाऱ्या नवी मुंबईकरांसाठी जानेवारी १९९६ मध्ये पालिकेने स्वतंत्र बससेवा सुरू केली. २५ बसगाडय़ांपासून सुरू झालेल्या एनएमएमटीकडे सध्या ४४५ बसेसचा ताफा आहे, मात्र राज्यातील इतर परिवहन उपक्रमांप्रमाणे हा उपक्रमही तोटय़ात सुरू आहे. या उपक्रमाला तोटय़ातून नफ्यात आणण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वाशी, सीबीडी आणि रबाळे आगारांचा व्यावसायिक वापर करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. जून २००७ मध्ये सिडकोने या बसडेपोचे भूखंड पालिकेला हस्तांतरित केले. पालिका या भूखंडांचा विकास करून परिवहन सक्षम बनवू शकणार आहे.

वाशी बस डेपोची जागा मोक्याची असून १० हजार चौरस मीटरचा विकास व्यावसायिक दृष्टीने केल्यास, या इमारतीतील जागा भाडेपट्टय़ाने दिल्यास उपक्रमाच्या तिजोरीत १०० कोटी रुपयांच्या वर रक्कम जमा होऊ शकेल, असा अंदाज आहे.

सीबीडी बस डेपोचे क्षेत्रफळ ३८ हजार चौरस मीटरचे आहे. यात रबाळे येथील जमीन ही बीएमटीसीने बस आगारासाठी राखीव ठेवली होती. त्यामुळे त्याचे क्षेत्रफळ साडेतीन एकर आहे. परिवनह उपक्रम या ठिकाणी एखादा मॉलदेखील उभारू शकणार आहे. दीड एफएसआयवर बांधण्यात येणाऱ्या इमारतीत बँका, कंपन्यांची कार्यालये, तसेच दुकाने थाटता येतील.

बंगळुरुत १०० कोटींचे उत्पन्न

कर्नाटकच्या बंगळुरु शहरात १३ आगारांत व्यावसायिक इमारती बांधल्या असून या उपक्रमातून त्यांच्या तिजोरीत वर्षांला १०० कोटी रुपये जमा होत आहेत. त्याचप्रमाणे ह्य़ा तीन जमिनींचा विकास केला जाणार आहे. या तीन भूखंडांचा विकास केल्यानंतर घणसोलीतही अशाच स्वरूपाचा उपक्रम राबवणे विचाराधीन असल्याचे सांगितले जाते.

वाशी, सीबीडी आणि रबाळे आगारांचा व्यावसायिक दृष्टिकोनातून विकास करण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी लागणाऱ्या शासन व सिडकोच्या परवानग्या घेण्यात आल्या असून पालिका हा विकास स्वत करणार आहे. त्यासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येणार असून वर्षभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. या व्यावसायिक वापरामुळे उपक्रमाला चांगला नफा मिळू शकणार आहे.

शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, नवी मुंबई परिवहन उपक्रम

तीन नवीन मार्गावर बससेवा

  • प्रवाशांच्या मागणीची अखेर पूर्तता

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने (एनएमएमटी) नवी मुंबईकरांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी बस ट्रॅकर अ‍ॅप सुरू केल्यानंतर आता तीन नव्या मार्गावर सेवाही सुरू केली आहे. कोपरखैरणे, वाशी-घणसोली, नेरुळ-मुलुंड असे हे मार्ग आहेत. रेल्वे स्थानक ते बाजार आणि सरकारी कार्यालये या प्रवासासाठी सेवा देण्यात यावी अशी मागणी एनएमएमटीकडे वारंवार केली जात होती. त्या धर्तीवर हे मार्ग सुरू करण्यात आले आहेत.

मार्ग क्रमांक ५ : कोपरखैरणे ते वाशी रेल्वे स्थानक मार्गे कोपरखैरणे सेक्टर-११ हा नवा मार्ग सुरू करण्यात आला आहे. कोपरखैरणे रेल्वे स्थानक, बोनकोडे तलाव कॉर्नर, शंकर दळवी आरोग्य केंद्र सेक्टर-१२ बी, कॉर्पोरेशन बँक, नारायण कॉम्प्लेक्स, पाम सोसायटी, बोनकोडे गाव, कलश उद्यान, कोपरी नाका, वाशी बस आगार व रेल्वे स्थानक असा हा मार्ग आहे.

nmmt-chart

मार्ग क्रमांक २८ : घणसोली आगार, घरोंदा, नवी मुंबई सीटी स्कूल, कोपरखैरणे बस स्थानक, एपीएमसी बाजार संकुल, सानपाडा रेल्वे स्थानक, जुईनगर रेल्वे स्थानक, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ते नेरुळ बस स्थानक असा मार्ग आहे.

मार्ग क्रमांक १११ :  नेरुळ बस स्थानक ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड) अशी सेवा सुरू करण्यात आली आहे. नेरुळ बस स्थानक, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज, जुईनगर रेल्वे स्थानक, तुर्भे नाका, एपीएमसी, वाशी बस स्थानक, वाशी हायवे, वाशी गाव, वाशी टोल नाका, रमाबाईनगर, घाटकोपर बस स्थानक, विक्रोळी आगार, भांडुप रेल्वे स्थानक, शांग्रिला, डंकन कंपनी, कामगार रुग्णालय, महाराणा प्रताप चौक असा हा मार्ग आहे.

नवी मुंबईतील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी परिवहन प्रशासन प्रयत्नशील आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या मार्गावरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता हे नवे मार्ग सुरू करण्यात आले आहेत. नवी मुंबईकरांना आगामी कालावधीत मुंबई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर या मार्गावरदेखील सेवा देण्यात येणार आहे.

शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 12:50 am

Web Title: nmmt bus depot development
Next Stories
1 आठवडा बाजार आता ऑनलाइन
2 वंडर्स पार्कमध्ये वृक्षवल्लींचा मेळा
3 खाऊखुशाल : पोटभर छोले भटुरे
Just Now!
X