रोखडरहित प्रवास; प्रायोगिक तत्त्वावर तीन मार्गावर सुविधा

बेस्ट, एसटीच्या धर्तीवर नवी मुंबई परिवहन उपक्रमानेही रोखडरहित तिकिटासाठी नवी आयटीएमएस प्रणाली विकसित केली असून या महिनाअखेर प्रायोगिक तत्त्वावर प्रवाशांसाठी ही ‘ओपन लूप’ कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे कार्ड इतर व्यवहारांसाठीही वापरता येणार आहे.

नवी मुंबई परिवहन सेवेने अत्याधुनिक व स्मार्ट सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यात वातानुकूलित बस, प्रत्येक बस थांब्यावर इंडिकेटर, घरबसल्या तिकीट बुकिंगसाठी अ‍ॅप अशा सुविधा देण्यात येत

आहेत. यात आता या ‘ओपन लूप’ कार्डची भर पडणार आहे. यासाठी नवी मुंबई परिवहन उपक्रमाणे एचडीएफसी बँकेसोबत राष्ट्रीय कॉमन मॉबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अंतर्गत भागीदारी केली आहे.

या सुविधेचे महिलादिनी उद्घाटन करण्यात आले आहे. मात्र यंत्रणा उपलब्ध न झाल्याने ती सेवा सुरू झालेली नाही. महिनाअखेर ती सुरू करण्यात येईल, असे परिवहन प्रशासनाने सांगितले आहे.

प्राथमिक स्वरूपात वातानुकूलित मार्गावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यांनतर प्रतिसादानुसार एप्रिल महिन्यात सर्व वातानुकूलित मार्गावर ही सेवा सुरू होईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास सध्या बसेसमध्येही ते सुरू करण्याचा विचार आहे.

यासाठी २५ हजार स्मार्टकार्ड, २५० मशीन मागविण्यात आल्या असून त्या आठवडाभरात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना रोखडरहित व्यवहार करून तिकीट उपलब्ध होणार असल्याने सुटय़ा पैशांची समस्याही यामुळे सुटणार आहे.

इतर व्यवहारासाठीही वापर

या ‘ओपन लूप’ कार्डने प्रवाशांचा प्रवास स्मार्ट, कॅशलेस तर होणार आहेच, शिवाय दैनंदिन इतर व्यवहारासाठीही हे कार्ड वापरता येणार आहे. आपल्या गरजेनुसार यामध्ये रिचार्ज करता येणार असून इतर वस्तू खरेदीसाठी ते वापरता येईल. ते भारतात कोठेही चालेल.