|| पूनम धनावडे

नवीन कांद्याच्या आगमनास पावसामुळे विलंब; साठवून ठेवलेल्या कांद्याची विक्री :- दिवाळीच्या दरम्यान झालेल्या पावसामुळे राज्यातून नवीन कांदा बाजारात येण्यास विलंब होत असल्याने वाढत असलेल्या कांद्याच्या दरांची सर्वसामान्य ग्राहकांवरील चढाई सुरूच आहे. कांद्याच्या दरांनी सत्तरी गाठली असताना साठेबाज व्यापाऱ्यांनी आता साठवून ठेवलेला कांदा बाहेर काढून त्याची चढय़ा दराने विक्री आरंभली आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत जुना कांदा ६५ ते ७० रुपये किलो दराने विकला जात असून किरकोळ बाजारात हे दर आणखी वाढवण्यात येत आहेत.

नोव्हेंबरच्या सुमारास राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये नवीन कांद्याचे आगमन होते. मात्र यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाला मोठा फटका बसला असून नवीन कांद्याचा हंगामदेखील लांबला आहे. याचा गैरफायदा घेत मोठय़ा व्यापाऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा विक्रीस काढला आहे. हे व्यापारी, खरेदीदार मार्च ते मे दरम्यान शेतकऱ्यांकडून  कमी दरांत कांदा खरेदी करतात व तो गोदामात साठवून ठेवला जातो. कांद्याचा भाव वाढल्यानंतर तो विक्रीस काढण्यात येतो. यंदाही तोच क्रम पाहायला मिळत असून सध्या बाजार समितीत उपलब्ध असलेला बहुतांश कांदा साठवणुकीच्या माध्यमातून आलेला आहे. वाशी येथील एपीएमसीमध्ये गुरुवारी आलेल्या कांद्याच्या ७० गाडय़ांपैकी ४० गाडय़ा जुन्या कांद्याच्या होत्या. घाऊक बाजारात जुना कांदा ६५-७० रुपये किलो तर नवीन कांदा ५५-६० रुपये किलो दराने विकला जात आहे. सध्या राज्यात सरकार स्थापन झाले नसल्याने कांद्याच्या अशा साठवणुकीवर कारवाईही ठप्प झाली आहे. याचा गैरफायदा व्यापाऱ्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

साठेबाजीतून सट्टेबाजी

कांद्याचे मोठे व्यापारी किंवा खरेदीदार मार्च, एप्रिल आणि मे शेतकऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणात कांदा खरेदी करतात व तो कांदा चाळी, गोदामांत साठवून ठेवला जातो. या कांद्याला पुढील सात ते आठ महिने किती बाजारभाव मिळेल, यावर चक्क सट्टा लावण्यात येतो, अशी माहिती एपीएमसीतील घाऊक व्यापाऱ्यांनी दिली. दरांनी उसळी घेतली की, हा कांदा विक्रीसाठी बाजार समितीमध्ये पाठवण्यात येतो.

सध्या बाजारात नवीन कांद्याचा हंगाम लांबला आहे तसेच पावसाच्या अतिवृष्टीचा फायदा घेत मोठे व्यापारी व खरेदीदार कांद्याला चढे दर मिळत असल्याने साठवणुकीचा कांदा बाहेर काढत आहेत. त्यामुळे कांद्यच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. तसेच घाऊक बाजारात खरेदी केलेले किरकोळ ग्राहक किरकोळ बाजारात दुपटीने विक्री करत असल्यामुळे देखील दरात वाढ होत आहे. या दोघांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात सरकार नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे .

– मनोहर तोतलानी, घाऊक व्यापारी, कांदा बटाटा बाजार एपीएमसी