पनवेलच्या खाडीमधून राजरोस वाळू उत्खनन करून तालुक्यातील विकासकांना वाळू पुरविणाऱ्यांविरोधात पनवेलचे पोलीस आणि महसूल विभागाने दंड थोपटले आहेत. बुधवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत झालेल्या या धडक कारवाईमुळे वाळूमाफिया रातोरात फरार झाले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांच्या पथकाने खारघर येथे केलेल्या या कारवाईमध्ये रेतीची बेकायदा वाहतूक करणारे सहा ट्रक तसेच रेती धुण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करून सहा जणांवर कारवाई केली. तर, पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी कामोठे गावामध्ये शिरून वाळू बंदरावर छापा टाकला. तेथून त्यांनी वीस ब्रास वाळू जप्त केली.
पनवेल तालुक्यामधील गणेशपुरी, तळोजा, पारगाव (उलवा), खारघर, कामोठे या गावांना खाडीकिनारा आहे. या किनारपट्टीचा फायदा वाळूमाफिया घेत आहेत. खाडीला ओहोटी असताना बाझ (लहान होडय़ा) खाडीत पाठवायच्या आणि रात्री खाडीला भरती आल्यानंतर वाळूने भरलेल्या होडय़ा किनारपट्टीला आणायच्या, या पद्धतीने हा काळा धंदा चालतो. पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी बुधवारी आपल्या पथकाला संबंधित छाप्याच्या ठिकाणाचे नाव न सांगता जुई-कामोठे गावात किनारपट्टीवर कारवाई केली. या गावात दररोज रात्री वाळूचे उत्खनन केले जाते, अशी माहिती तहसीलदार आकडे यांना मिळाली होती. त्यानुसार ही गुप्त कारवाई करण्यात आली.
पनवेल तालुक्यामध्ये मोठय़ा प्रमाणात इमारतींची बांधकामे सुरू असल्याने वाळूचे बेकायदा उत्खनन करून ती बांधकामाच्या ठिकाणी पोहचवण्यासाठी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकमालकांचीही लॉबी तयार झाली आहे. यामुळे रात्री मोठय़ा प्रमाणात वाळूचे ट्रक रस्त्यांवर धावताना दिसतात. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी पहाटे खारघरमधील सेक्टर २७ येथे रस्त्याच्या कडेला वाळू धुणाऱ्यांना रंगेहात पकडले. अशाच प्रकारच्या एका ट्रकचा पाठलाग करताना पोलिसांना आणखी पाच ट्रक सापडले.
करमुक्त धंदा
खाडीकिनारपट्टी असलेल्या गावांतील प्रमुखांना हाताशी धरायचे, खाडीकिनारा वापरण्याची परवानगी मिळवायची, प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना चिरीमिरी द्यायची आणि हा काळा धंदा करायचा, असा प्रकार या वाळूचोरीत होत आहे. खाडीमध्ये जाण्यासाठी लहान होडय़ांवर सक्शन पंप बसवायचे आणि मजुरांचा ताफा होडीतून खाडीत सोडायचा. खाडीतून होडी भरून वाळू उपसल्यानंतर भरतीदरम्यान ती होडी काळोखात खाडीकिनारी आणायची. किनारपट्टीला मोठे खड्डे करून त्यामध्ये रेती धुण्याची सोय करायची, अशी पद्धत हे वाळूचोर अवलंबतात. रात्रीपासून पहाटेपर्यंत आठ तास हा खेळ सुरू असतो. धुतलेली ही वाळू विकासकांना पाच हजार रुपये प्रति ब्रास या दराने पहाटेच पोहचवली जाते. एका ट्रकमालकाची एका रात्रीची कमाई लाखांत असते. पनवेल तालुक्यातील सर्वच खाडीकिनारी अशा शंभराहून अधिक होडय़ा हा काळा धंदा करतात. हत्त्या व चोरीचे १२ गुन्हे दाखल असणारा गुंड या वाळूमाफियांचा म्होरक्या आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Oct 2015 रोजी प्रकाशित
पनवेलमध्ये बेकायदा वाळू उत्खननावर छापे
पनवेलच्या खाडीमधून राजरोस वाळू उत्खनन करून तालुक्यातील विकासकांना वाळू पुरविणाऱ्यांविरोधात पनवेलचे पोलीस आणि महसूल विभागाने दंड थोपटले
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 02-10-2015 at 08:12 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raids on illegal sand mining