पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका

उरणची संरक्षण भिंत असलेल्या व ऐतिहासिक वारसा म्हणून गणल्या गेलेल्या द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे करून बांधकामे सुरू असून त्यासाठी झाडांची कत्तलही केली जात आहे. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात उरणच्या तहसील कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे २०१५ मध्ये अहवाल पाठविलेला असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. तसेच या डोंगरावरील जागा वन विभागाचीही असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
द्रोणागिरी डोंगराच्या कुशीत देशातील ओएनजीसीचा सर्वात मोठा तेलशुद्धीकरणाचा प्रकल्प आहे. द्रोणागिरीच्या पायथ्याचे २००९ साली उत्खनन सुरू केल्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी द्रोणागिरी बचाव संघटना काढून कडाडून विरोध केला. तसेच माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा देताच तातडीने उत्खनन थांबविण्यात आले होते; मात्र त्यानंतर द्रोणागिरीच्या पायथ्याशी बांधकामांचा सपाटा सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी बेकायदा इमारतीही उभ्या केल्या जात आहेत. त्यासाठी उत्खननही केले जात आहे. अशा प्रकारची घटना रायगड येथील महाडमधील दासगाव तसेच इतर अनेक ठिकाणी दरडी कोसळ्याने गावेच्या गावे दरडी खाली आली होती. २०१५ च्या पावसाळ्यात द्रोणागिरीच्या परिसराची पाहणी करून या परिसराला दरडीचा धोका असल्याचा अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती उरणचे नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांनी दिली आहे. या संदर्भात आपत्कालीन आराखडा तयार करून त्यासाठी उपाययोजनाही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलतांना दिली. या संदर्भात उरणच्या वन विभागाचे वनसंरक्षक चंद्रकांत मराठे यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.