या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिका आयुक्तांचे सर्वसाधारण सभेत आश्वासन

नवी मुंबई शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सभागृहात दिले. पाणीप्रश्नावर मंगळवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. यात शहराचे स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असताना शहराच्या काही भागांत कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे नगरसवेकांनी निदर्शनास आणून दिले. यावर नगरसेवक सूरज पाटील यांनी लक्षवेधी मांडली. महापौरांनी शहराला पूर्ण क्षमतेने २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आदेश आयुक्तांना दिले.

आयुक्तांनी राष्ट्रीय जलधोरणानुसार प्रत्येक व्यक्तीमागे १३५ लिटर पाणी देण्याचा निर्णय घेत पाणीकपात केली. या निर्णयाविरोधात सर्वसाधरण नगरसेवकांनी टीकेची झोड उठवली. नगरसेविका सुलजा सुतार यांनी आयुक्त भेट नाकारत असल्याचा आरोप केला. आयुक्तांना पाणी प्रश्नावर भेट घेण्यासाठी गेले असता त्यांनी चार तास वाट पाहायला लावली व त्यानंतरही भेट दिली नाही, असे सुतार म्हणाल्या.

पाण्याचे वेळापत्रक अनियमित आहे. याचा गृहिणींना ताप सहन करावा लागत आहे. घरात पुरेसे पाणी भरण्याआधीच ते बंद होत असल्याचे नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी निदर्शनास आणून दिले.

शहरातील पाणीगळतीचे प्रमाण १९ टक्के आहे. गेल्या वर्षीही विशेष सर्वसाधरण सभेत पाणी विषयावर लक्षवेधी मांडण्यात आली होती; परंतु वर्ष उलटूनही त्यावर तोडगा का निघाला नाही, असा संतप्त सवाल मंदाकिनी म्हात्रे यांनी केला. वाशीमध्ये बी टाइप रहिवाशी संकुलात पाणीपुरवठय़ाचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे त्यांनी सांगितले.

पाणी वेळेच्या आधीच बंद होत असल्याने वा ते येतच नसल्याने रहिवाशांचे सकाळपासूनच फोन खणखणून लागतात, अशी तक्रार नगरसेविका फाशीबाई भगत यांनी केली.

पर्यावरण अहवालात पाणीगळतीचे १९ टक्के नसून ते ३५ टक्क्य़ांपर्यंत असल्याचा आरोप नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी केला. महापालिकेच्या दफ्तरी लोकस्ांख्येची चुकीची माहिती नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना कमी पाणीपुरवठा होत असल्याची माहिती नगरसेविका सरोज पाटील आणि मेघाली राऊत यांनी दिली. पाण्याच्या मुद्दय़ावरून आयुक्तांची चुकीची प्रतिमा तयार करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप नगरसेवक किशोर पाटकर यांनी केला. शहरात काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. तर काही ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये नादुरुस्ती निर्माण झाल्याने पुरवठय़ात अडथळे निर्माण होत असल्याचे पाटकर म्हणाले. या वेळी विरोधी बाकावरील नगरसेवकांनी आयुक्तांच्या पाणीकपातीला पाठिंबा दिला. सभागृह नेते जयंवत सुतार यांनी आयुक्त केवळ शहरी भागातच फिरतात. त्यांनी झोपडपट्टय़ा आणि गावठाणांकडे कधी फेरफटका मारला तर पाण्याची स्थिती त्यांच्या लक्षात येईल. प्रतीमाणसी १३५ लिटर पाणी घेण्याचा निर्णय हा त्यामुळेच चुकीचा असल्याची टीका सुतार यांनी केली.

११ हजार नळजोडण्या तोडल्या

सुमारे आठ तास चाललेल्या चर्चेत ४४ नगरसेवकांनी तक्रारी, गाऱ्हाणी मांडली. काहींनी मते व्यक्त केली. आयुक्त सभागृहाला विश्वासात घेत नाहीत. ते परस्पर निर्णय घेतात. याबद्दल महापौर सुधाकर सोनवणे यांनीही नाराजी व्यक्त केली. यावरून त्यांनी आयुक्तांवर टीका केली. शहर अंभियता मोहन डंगावकर यांनी पाण्याचा अपव्यय होत असल्याने आणि मोजमाप होत नसल्याने पाणी वितरण पद्धतीत बदल केल्याची माहिती दिली. याच वेळी शहरातील ११ हजार बेकायदा जोडण्या तोडल्याची माहिती सभागृहला दिली. यावर महापौरांनी झोपडपट्टीतील नळजोडण्या तोडून प्रशासनाने काय साध्य केले, असा सवाल केला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 hrs water supply in navi mumbai
First published on: 25-08-2016 at 00:32 IST