पनवेल ः मागील महिन्यात तळोजा फेज २ येथील घोटगावाजवळ अरिहंत अनंत कन्स्ट्रक्शन कंपनीचे काम सुरु असताना ३६ वर्षीय तरुणाचा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला होता. या घटनेबाबत तळोजा पोलिसांनी संबंधित इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात सुरक्षेबाबत निष्काळजी केल्यामुळे गुन्हा नोंदविला आहे.
हेही वाचा – पनवेल: पंधरा दिवसांपूर्वी सुरक्षित असलेला फलक पडलाच कसा
घोटकॅम्प गावात राहणारे ३६ वर्षीय प्रविण शिंदे यांचा या अपघातामध्ये १६ जूनला मृत्यू झाला होता. प्रविण यांच्या पत्नी स्मिता यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ठेकेदार पंकज पटोलिया याच्या दुर्लक्षितपणामुळे इमारतीचे बांधकाम सुरु असताना उदवाहकासाठी जागा खुली सोडून त्यावर कोणतीही व्यक्ती जाऊ नये यासाठी सुरक्षेचे कोणतेही उपाय न केल्यामुळे उदवाहकाच्या मोकळ्या मार्गातून खाली कोसळल्याने ते जागीच ठार झाले होते. तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय अहिरे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
