नवी मुंबई : अवघ्या देशाची मान शरमेने खाली घालायला लावणाऱ्या मणिपूरमधील महिला भगिनींवरील अत्याचाराच्या घटनेने नवी मुंबईकर जनता देखील संतप्त आणि व्यथित झाली आहे. या नृशंस घटनेचा निषेध म्हणून आणि आपल्या भावनांना मोकळी वाट करून देण्यासाठी नागरिकांनी थेट राष्ट्रपती  द्रौपद्री मुर्मु यांना साकडे घातले आहे. मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला आदेश द्यावेत, अशी विनंती करणारे पोस्टकार्ड राष्ट्रपती मुर्मु यांना  नागरिकांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात येत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सीवूडस पश्चिम विभागप्रमुख समीर अमीन बागवान यांच्या पुढाकाराने सीवूड्स रेल्वे स्टेशन, डी मार्ट परिसरात “एक पोस्टकार्ड मणिपूरसाठी, महिला भगीनींसाठी” ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सहभागी होत अनेक नागरिकांनी आपली नावे आणि पत्ता पोस्टकार्डवर नोंदवली. यामध्ये महिला माता-भगिनींचा सहभाग लक्षणीय होता. ही सर्व पत्रे तातडीने राष्ट्रपती भवनाला पाठवण्यात येणार असून राष्ट्रपतींनी याची दाखल घ्यावी, अशी अपेक्षा सीवूडवासियानी व्यक्त केली.

पत्रात काय?

मी खाली सही करणार, या देशाचा सर्वसामान्य नागरिक,  या पत्राद्वारे आपणास नम्र निवेदन करत आहे. जवळपास गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून आपल्या देशाचा अविभाज्य भाग असलेले मणिपूर राज्य जातीय हिंसाचाराच्या भीषण आगीत होरपळून निघत आहे. या हिंसाचारात  दीडशेहून अधिक निष्पाप नागरिकांचा नाहक जीव गेला आहे.  नुकतीच एक अतिशय बिभत्स आणि तितकीच संतापजनक घटना मणिपूरमध्ये घडली. कुकी जनजातीच्या समूहाच्या दोन महिलांवर सामुदायिक रित्या अनन्वित अत्याचार करत त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 तुम्ही देशाच्या सर्वोच्च पदावर आहात. तुम्ही स्वतः महिला सुद्धा आहात. मणिपूर मध्ये घडणाऱ्या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण शांत का आहात हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला छळत आहे. राष्ट्रपती महोदया,  देशाच्या राष्ट्रपती म्हणून आणि एक महिला म्हणून आपली शक्ती वापरण्याची हीच ती वेळ आहे. मणिपुरमधील महिलांच्या रक्षणासाठी, तेथील जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण कृपया पुढाकार घ्यावा. मणिपूर राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण केंद्र आणि राज्य सरकारला आदेश द्यावेत, ही विनंती.