नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजीत बांगर यांची बदली नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून झाली आहे. मंगळवारी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडून बांगर यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला. पुणे विद्यापीठातून एम. ए. (अर्थशास्त्र) असणारे बांगर हे २००८ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत.
नागपूर विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या बांगर यांनी यापूर्वी रायगड जिल्ह्यातील माणगावचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर विधायक कार्य केलेले आहे. काही काळ त्यांनी पुण्यातील गोखले इन्स्टिट्युटमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केलेले आहे.
त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी आदिवासीबहुल जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावी कामगिरी केली आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तसेच नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून प्रशासकीय कौशल्याची छाप सोडली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर शहरातील करोनास्थिती नियंत्रित आणण्यासाठीचे मोठे आव्हान बांगर यांच्यासमोर असणार आहे. कारण, शहरातील करोनास्थितीवर नियंत्रण मिळवता न आल्यानेच मिसाळ यांची स्थगित केलेली बदली पुन्हा झाल्याचे बोलले जात आहे.
पालिकेतील कामाबाबत समाधानी – मिसाळ
नवी मुंबई महापालिकेत १८ जुलै २०१९ ला नेमणूक झाल्यानंतर शरातील विविध विकासकामांना प्राधान्य दिले होते. तसेच शहराला शहर स्वच्छतेत चांगले रेटिंग मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे शहरातील विविध उड्डाणपुल, सायन्स सेंटर, वाशी डेपो यांच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. तसेच करोना काळातही इतर महापालिकेच्या तुलनेत आकडेवारीमध्ये नवी मुंबईतील स्थिती चांगली राखली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या कामाबाबत समाधानी असल्याची भावना माजी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केली आहे.
