लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून एका महिलेची हॉटेलमध्ये हत्या केल्याचे समोर आले. हत्या केल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीस तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. हत्या कुठल्या कारणाने केली याबाबत ठोस माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सोहेब कलाम शेख (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याची ओळख एका ३५ वर्षीय महिलेशी होती. त्या दोघात काही कारणांनी वाद झाला होता. यात समज-गैरसमज दूर करू म्हणून दोघेही तुर्भे एमआयडीसीतील आश्वी लॉजमध्ये आले. रात्री आकाराच्या सुमारास सोहेब हा बाहेर निघून गेला. खूप वेळ झाला तो आलाही नाही आणि दरवाजाही उघडा असल्याने कर्मचाऱ्यांनी आत जाऊन पाहिले असता सदर महिला निपचित पडलेली आढळून आली. त्यामुळे तुर्भे एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावेळी तातडीने घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त राहुल गायकवाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकरसह पथकाने धाव घेतली.
आणखई वाचा-उरणच्या पाणजे पाणथळीवर पक्ष्यांची शाळा
सदर महिला मृत अवस्थेत असल्याचे लक्षात येताच वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णलयात दाखल करण्यात आले. याबाबत मंगळवारी सकाळी हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा मोहाली व्हिलेजमध्ये आढळून आला त्याला अटक करण्यात आली असून चारित्र्याच्या संशयावरून त्याने ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.