नवी मुंबई : पर्यावरणप्रेमी आणि लोकप्रतिनिधींच्या कठोर निषेध आणि विरोधानंतर गुरुवारी अखेर लोटस तलावातील भरावाचे काम थांबले. ठेकेदारांनी भराव करण्यासाठी आणलेले पोकलेन यंत्र तसेच इतर वाहने माघारी नेली. नवी मुंबईतील पाणथळ तलाव असलेल्या या लोटस तलावात सिडकोने भराव टाकण्याची परवानगी मे. ठाकूर इन्फ्रा (टीआयपीएल) या ठेकेदार कंपनीला दिली होती.
मागील दोन दिवस पर्यावरणप्रेमी, नागरिक, स्थानिक नगरसेवक यांच्या विरोधाला न जुमानता ठेकेदाराने भराव करण्याचे काम सुरू ठेवले होते. परंतु लोकप्रतिनिधी व पर्यावरणप्रेमी यांच्या विरोधामुळे अखेर भरावाचे काम थांबवले आहे. परंतु तरीदेखील टीआयपीएल कंपनीने लोटस तलावात जवळजवळ १०० डंपर भराव टाकला आहे.
उच्च न्यायालयाने लोटस संरक्षित पाणथळ तलावाचे संवर्धन करण्याचे आदेशित केलेले असताना लोटस तलाव बुजवण्याचा सिडकोचा प्रयत्न होता, परंतु तो सफल झाला नाही. लोटस तलाव संरक्षित करण्यासाठीचा अंतिम निर्णय झालेला नसल्याने या पाणथळ तलाव वाचवण्यासाठी सातत्याने आवाज उठवणार असल्याचा विश्वास नागरीकांनी व पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे.
सिडकोची वागणूक बेकायदेशीर व बेजबाबदार आहे. लोटस तलाव हा संरक्षित पाणथळ तलाव असताना सिडको मनमानी करत आहे. वेळ पडल्यास सिडको व्यवस्थापकीय संचालकांना न्यायालयात खेचू. स्टॅलिन दयानंद , संचालक वनशक्ती