‘एमएमआरडीए’चा दावा; बारा किलोमीटर मार्गाचे काम प्रगतिपथावर
लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : मुंब्रा, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरी भागाला औद्योगिक व व्यावसायिक चालना देऊ पाहणाऱ्या ऐरोली- कल्याण- काटई या बारा किलोमीटर मार्गाचे काम प्रगतिपथावर असून या मार्गातील पहिला टप्पा पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी ऐरोली बाजूकडील या कामाची पाहणी केली, तर गुरुवारी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या कामाचा आढावा घेतला. त्या वेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
या मार्गासाठी पारसिक डोंगर पोखरून दीड किलोमीटरचा बोगदा तयार केला जात आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोगद्यापेक्षा हा बोगदा मोठा असणार आहे.
मुंबईत रस्तेमार्गे जाणाऱ्या नोकरदारांना नेहमीच कळवा, महापे, शिळफाटा येथील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरून प्रवास करताना अर्धा ते एक तास हा केवळ वाहतूक कोंडीमुळे जादा लागत आहे. त्यामुळे वाहनापेक्षा रेल्वे परवडली, अशीचा भावना नोकरदारांची आहे. याच काळात मुंब्रा, शिळफाटा, कल्याण मार्गावर मोठय़ा प्रमाणात विकासकांनी गृहसंकुले उभारली असून मुंबई, ठाण्यात घर घेणे न परवडणाऱ्या ग्राहकांनी या क्षेत्राला पसंती दिली आहे. देशातील एका बडय़ा विकासकाने या ठिकाणी विस्तीर्ण असा महागृहप्रकल्प उभारला आहे. मागील भाजपा सरकारशी जवळीक असलेल्या या विकासकाच्या मागणीमुळे का होईना या मार्गावर होणारी सततची वाहतूक कोंडी सुटणार आहे. दोन वर्षांपूर्वी एक हजार कोटी रुपये खर्चाच्या या कामाला सुरुवात झाली असून ऐरोली ते ठाणे बेलापूर मार्ग, ठाणे-बेलापूर ते मुंब्रा बायपास आणि मुंब्रा बायपास ते कल्याण- कटई असा बारा किलोमीटरचा प्रत्येकी तीन मार्गिका असलेला हा रस्ता उभारण्याचे काम सुरू आहे. टाळेबंदीच्या काळात हे काम मजुरांअभावी संथगतीने सुरू होते. त्याला आता पुन्हा वेग आला असून पुढील वर्षी सप्टेंबपर्यंत या मार्गावरील पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कल्याण डोंबिवली, मुंब्रा, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या क्षेत्रांतून नवी मुंबई व मुंबईत दररोज हजारो कामगार, व्यापारी ये-जा करीत आहेत. तुर्भे येथील एपीएमसी घाऊक बाजारातील व्यापारीही या क्षेत्रातून प्रवास करीत आहे. त्यांच्यासाठी खासगी वाहतूक व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. त्यामुळे या नवीन मार्गाने झपाटय़ाने नागरीकरण वाढणारी शहरे जोडली जाणार आहेत.
वाहतूक कोंडीवर उपाय
- शिळफाटा मार्गावर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बांधण्यात आलेल्या मार्गावर ठाणे-बेलापूर ते मुंब्रा बायपास हा मार्ग पहिल्यांदा सुरू केला जाणार आहे.
- यानंतर मुंब्रा ते काटई व त्यानंतर ऐरोली मुलुंड खाडीपूल ते ठाणे-बेलापूर हा एलिव्हिटेड रस्ता बांधण्यात येणार आहे.