नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेतील घणसोली आगारात उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक बसला आज सकाळी ७ च्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीमध्ये घणसोली बस आगारात उभ्या असलेल्या जुन्या इतर ३ बसला ही आग लागण्याची घटना घडली आहे.
अचानक लागलेल्या आगीमुळे बस गाड्यांना लागलेली आग विझवण्यासाठी कोपरखैरणे, वाशी, नेरूळ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आग विझवली आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अचानक लागलेल्या इलेक्ट्रिक बसच्या आगीबाबत अधिक चौकशी करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली आगारात देखभाल दुरुस्तीसाठी आगीत जळून खाक झालेली १ इलेक्ट्रिक बस दुरुस्तीसाठी २८ मे पासूनच या आगारात उभी होती. परंतु आज सकाळी या इलेक्ट्रिक बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. घणसोली आगारात अचानक लागलेल्या आगीमुळे ही आग विझवण्यासाठी कोपरखैरणे वाशी ,नेरूळ येथील अग्निशमन दलाच्या गाड्या काही वेळातच घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाच्या महालक्ष्मी कंपनीच्या १११ डिझेल बसगाड्या या आगारात उभ्या करण्यात आल्या होत्या. या बस पालिका परिवहन सेवेतून रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे या १११ डिझेल बस या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या होत्या. या गाड्यांच्या समवेत १ इलेक्ट्रिक बस दुरुस्तीसाठी मागील काही दिवसापासून उभी होती तिला आज सकाळी अचानक आग लागल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. घणसोली आगारात घडलेल्या या दुर्घटनेत एक इलेक्ट्रिक बस जळून खाक झाली असून त्याच्या बाजूला उभे असलेल्या ३ गाड्या जळाल्या असल्याची माहिती पालिका परिवहन विभागाने दिली आहे.
नवी मुंबई परिवहन उपक्रमात जवळजवळ ५२१ बस असून टप्प्याटप्प्याने पालिका परिवहन उपक्रमातील डिझेल बसची संख्या ही कमी करण्यात येत असून त्यासाठीच १११ डिझेल बस घणसोली आगारात उभ्या होत्या. नवी मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम हा पर्यावरण पूरक इंधनाचा अधिक अधिक वापर करून पर्यावरणपूरक बस सेवा देण्यासाठी अधिक प्रयत्नशील आहे. इंधन खर्चात बचत होऊन पर्यायाने उत्पन्नात वाढ होण्यासाठी इलेक्ट्रिक बसचा जास्तीत जास्त वापर करण्याचे नियोजन परिवहन उपक्रमाने पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात व्यक्त केले होते.
नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली आगारात उभ्या असलेल्या व दुरुस्तीसाठी आणलेल्या १ इलेक्ट्रिक बसला सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. त्यामुळे शेजारी उभे असलेल्या तीन डिझेल बस गाड्यांनाही आग लागली. परंतु अग्निशमन विभागाच्या सहकार्याने ही आग विझवण्यात आली आहे. या आगारात १११ डिझेल गाड्या उभ्या होत्या. दुर्घटनेतील चार गाड्या वगळता इतर गाड्यांना आग लागलेली नाही. आगीबाबतची योग्य व सखोल चौकशी करण्यात येत आहे.- योगेश कडुस्कर, व्यवस्थापक नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम