मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या ७ संचालकांचे संचालक पदाचा निर्णय पणन मंत्री यांच्याकडे हिवाळी अधिवेशनानंतर होणार आहे. परंतु त्या निर्णयाआधीच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सभापती अशोक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी आज बुधवारी दुपारी पणन संचालकांकडे आपला राजीनामा पाठवला आहे. पणन संचालकांकडून राजीनाम्याला मंजुरी दिल्यानंतर लवकरच या ठिकाणी निवडणूक लागणार आहे. या निवडणुकीतून नवीन सभापतीची निवड होणार असून सभापतीपदी कोण विराजमान होईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्यातील त्या त्या विभागातील एपीएमसी संचालकांचे तेथील पद रद्द झाल्याने संचालक म्हणून अपात्र ठरले आहेत. मुंबई एपीएमसीसह सहा विभागातून निवडून आलेल्या १८ संचालकांपैकी ७ संचालकांचे पद रद्द झाले होते. यामध्ये माधवराव जाधव (बुलडाणा), धनंजय वाडकर (भोर, पुणे),बाळासाहेब सोळसकर (कोरेगाव, सातारा),वैजनाथ शिंदे (लातूर),प्रभू पाटील (उल्हासनगर ठाणे),जयदत्त होळकर (निफाड नाशिक), अद्वय हिरे (नाशिक) यांचा समावेश आहे. ७ पद रद्द झाले होते तसेच सभापती अशोक डकसह तीन जणांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली होती. यादरम्यान मे महिन्यात आघाडी सरकारने संचालक पद रद्द केलेल्या निर्णयाला पणन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील सुनावणी होईपर्यंत स्थगिती दिली होती.
ऑक्टोबर आणि डिसेंबर मध्ये सुनावणी घेण्यात येणार होती. परंतु काही कारणामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून हिवाळी अधिवेशनानंतरच होईल अशी माहिती समोर आली होती. मात्र या दरम्यान सुनावणी होण्याआधीच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी पणन संचालकांना बुधवारी दुपारी आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता हा राजीनामा पणन संचालकांनी मंजूर करताच सभापती पद रिक्त होणार असून या ठिकाणी नव्याने निवडणुका घेण्यात येतील. येत्या पंधरा दिवसात पुढील चित्र स्पष्ट होणार आहे . अशी माहिती एपीएमसी प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता रिक्त झालेल्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सभापती अशोक डक आणि उपसभापती म्हणून मी धनंजय वाडकर ,आम्ही आज बुधवारी पणन संचालकांकडे राजीनामा पाठवला आहे. – धनंजय वाडकर, उपसभापती, एपीएमसी
सभापती अशोक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी आज पण संचालकांना राजीनामा पाठवला आहे. पणन संचालकांच्या मंजुरीनंतर हे पद रिक्त होणार असून निवडणूक अधिकारी नेमण्यात येईल . निवडणूक अधिकारी आणि इतर संचालक यांची बैठक घेऊन या दरम्यान सभापती आणि उपसभापती यांची निवडणूक होईल. –प्रकाश अष्टेकर, उपसचिव ,एपीएमसी
पणन चालकांकडून सभापतींचा राजीनामा मंजूर
एपीएमसी सभापती अशोक डक यांनी दि.२१ बुधवारी दुपारी पणन संचालकांकडे एपीएमसी सभापती पदाचा राजीनामा पाठवला होता. पणन संचालकांनी सभापतींचा राजीनामा तात्कळ मंजूर करून बुधवारी सायंकाळी ६ ते ७ दरम्यान एपीएमसी प्रशासनाला परिपत्रक पाठवून सभापतींचा राजीनामा मंजूर करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.