नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र काही गाड्या बाजार आवारात अशाच उभ्या असतात. त्यामुळे नवीन येणाऱ्या वाहनांची अडचण होते. यावर तोडगा काढण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने प्रत्येक बाजारातील प्रवेशद्वारावर फास्टॅग प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

एपीएमसी प्रशासकीय इमारतीत नुकतीच आमदार शशिकांत शिंदे व सचिव पी. एल. खंडागळे यांच्या उपस्थित बाजार समितीमधील अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच बाजाराच्या उत्पन्न वाढीसाठी पाचही बाजार आणि मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडीअडचणी सांगितल्या. यामध्ये बाजार समितीच्या आस्थापनावर कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांचा विरोध, नवीन भरती करण्याऐवजी शासनाकडून बाजार समिती मध्ये अधिकाऱ्यांना सेवेवर आणा जेणेकरून बाजार समितीचे कामकाज सुरळीत होईल तसेच बाजारात होणारी वाहतूक कोंडी यावर चर्चा करण्यात आली.

हे ही वाचा…मोरबे धरण बफर क्षेत्रात अनधिकृत बांधकाम?

या बैठकीत बाजारात फास्टॅग प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. टोलनाक्यांप्रमाणेच पाचही बाजारांच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स आणि फास्टॅग प्रणाली लावण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यावर आमदार शशिकांत शिंदे व सचिवांनी लवकरात लवकर ही यंत्रणा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

हे ही वाचा…खारघरमधील स्वप्नपूर्ती संकुलात अपुरा पाणीपुरवठा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक बाजाराच्या प्रवेशद्वारावर ही फास्ट टॅग प्रणाली येत्या काही दिवसात कार्यवनित करण्यात येणार आहे. यामुळे बाजारात विनाकारण उभ्या असलेल्या गाड्यांवर नियंत्रण मिळवता येईल आणि शेतमाल खाली करून देखील बाजारात उभे असलेल्या गाड्यांना दंड आकारता येईल, त्यामुळे वाहतूक कोंडीची ही समस्या मार्गी लागेल. त्याचबरोबर एपीएमसीच्या उत्पन्नवाढीत देखील भर पडेल. – डॉ. पी. एल. खंडागळे, सचिव, एपीएमसी