उरण : माजी खासदार दिबा पाटील यांच्या जन्मशताब्दी व नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याच्या मागणीसाठी रविवारी भिवंडी ते जासई अशी वाहन रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीची सांगता दिबांचे जन्मस्थान असलेल्या जासई येथे होणार आहे. या रॅलीच्या स्वागतासाठी गुरुवारी जासईच्या दिबा पाटील सभागृहात बैठक पार पडली. यावेळी जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी दिबांच्या नावासाठी जे जे पक्ष आणि संघटना पुढाकार घेतील त्या सर्वांच जासईत स्वागत केलं जाईल असे मत व्यक्त केले.

भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली दिबा पाटील साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रविवारी भिवंडी ते जासई असे नवी मुंबई मार्गे ‘दिबा मानवंदना कार रॅली ‘चे आयोजन करण्यात आलेले आहे.

यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीकडे केंद्र/राज्य सरकारचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरुवात भिवंडी माणकोली येथून सकाळी ९ वाजता निघणार असून नवी मुंबईतून पुढे जासई करिता मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे दिबा पाटील यांच्या त्यागातून साडेबारा टक्के भूखंडाचा लाभ घेतलेल्या प्रत्येकाला आवाहन करण्यात येत आहे की दिबा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने रॅली चे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहावे आणि रॅली मध्ये सहभागी ही व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पारंपरिक जवळा भाकरीचा बेत : रॅली साठी येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी खास व पारंपरिक सुका जवळा आणि तांदळाच्या भाकरीचा बेत ठरविण्यात आला आहे.

भिवंडी माणकोली,रेती बंदर खारीगाव, शीळ डोंबिवली कळवा नाका, ठाणे शहर आणि घोडबंदर रोड , दिघा रेल्वे स्थानका समोर (विटावा, आनंद नगर, दिघा , ऐरोली सिमेन्स कंपनी समोर (ऐरोली आणि दिवा ग्रामस्थ), रबाळे रेल्वे स्थानका समोर ( रबाळे, गोठिवली, आणि तळवली ग्रामस्थ), मुलुंड ऐरोली मार्गे, घणसोली नाका ( घणसोली ग्रामस्थ), रिलायन्स गेट (कोपरखैरणे आणि महापे ग्रामस्थ), कोपरी गाव हनुमान मंदिर (कोपरी, पावणे, बोनकोडे आणि जुहूगाव ग्रामस्थ), अरेंजा सर्कल वाशी (तुर्भे, सानपाडा, वाशी ग्रामस्थ), नेरूळ प्रशांत कॉर्नर सिग्नल ( जुईपाडा, शिरवणे, सारसोळे, कूकशेत) करावे चाणक्य सिग्नल (नेरूळ, दारावे आणि करावे ग्रामस्थ), नवी मुंबई पालिका मुख्यालय (बेलापूर, शहाबाज, अग्रोली आणि दिवाळे ग्रामस्थ), दिबा पाटील विमानतळ रेतीबंदर गेट, चिंचपाडा ब्रिज खाली (चिंचपाडा आणि पनवेल ग्रामस्थ), मोठा ओवळा गाव ( पारगाव ओवळा ग्रामस्थ), जासई – लोकनेते दिबा पाटील मंगल कार्यालय- समारोप असा मार्ग असणार आहे.

नामांतराच्या मागणीसाठी जासई येथे येणाऱ्या रॅलीत आपण सहभागी होण्याचा विचार करीत आहोत. असे मत दिबांचे चिरंजीव अतुल पाटील यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसात नवी मुंबई विमानतळ नामकरणा संदर्भात काहीतरी घोषणा होण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट केले.