पनवेल – पनवेल महापालिकेत आरोग्य विभागात काम करणा-या कंत्राटी कामगारांच्या फाईलवर सही करण्यासाठी एका उपायुक्ताने ३ टक्यांची रक्कम मागीतल्याने शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पनवेल महापालिकेच्या आयुक्तांना ही चुकीची कार्यपद्धती महापालिकेत रूजण्यापूर्वी तातडीने लक्ष्य घालून संबंधित उपायुक्तावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्याचे निवेदन दिले.

महापालिकेतील अधिका-यांच्या टक्केवारीच्या कारभाराला सत्ताधारी भाजपनेच लाल सिग्नल दिल्याने पारदर्शक कारभार करा, अन्यथा अधिका-यांना परत पाठवू असा इशारा या पत्रातून भाजप आमदारांनी दिला आहे. 

पनवेल महापालिकेमधील आरोग्य विभागात ४५० आरोग्यसेवक हे कंत्राटी पद्धतीने काम करतात. यापैकी १८० कंत्राटी आरोग्य सेवकांनमध्ये वैद्यकीय अधिकारी, पारिचारीका,अधिपरिचारीका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदांवर काम करणा-या आरोग्य सेवकांचे एका महिन्याचे देयक ज्यावेळेस आरोग्य विभागाच्या उपायुक्तांकडे गेल्यावर कंत्राटदाराकडे या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी ३ टक्के एवढी रक्कम मागण्यात आल्याचा आरोप कंत्राटदार कंपनीने केला.

वेळीच देयकाची रक्कम न मिळाल्यास आरोग्य विभागातील कर्मचा-यांचे वेतन कसे करावे यासाठी उपायुक्तांकडे विनवणी केली. याबाबत काही दिवसांपूर्वी कंत्राटदार कंपनीने भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक नितिन पाटील यांच्याकडे केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

नितिन पाटील यांनी तातडीने हा सर्व प्रकार आमदार प्रशांत ठाकूर यांना सांगितल्यावर आ. ठाकूर यांनी शुक्रवारी या संपुर्ण प्रकरणात सखोल पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांना लेखी निवेदन देऊन महापालिकेला भ्रष्टाचाराची लागण लागू नये म्हणू या प्रकरणाची चौकशी करून कंत्राटदाराकडून देयक मंजूरीसाठी ३ टक्के मागणारे उपायुक्त प्रसेनजीत कारलेकर यांच्यावर कडक कारवाईची करा, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत उपायुक्त कारलेकर यांच्याकडील सर्व विभाग काढून घ्यावेत अशी मागणी आ. ठाकूर यांनी केली.

उपायुक्त कारलेकर यांच्याकडे महापालिका आयुक्तांनी आरोग्य, शिक्षण अशा महत्वाच्या विभागांची जबाबदारी दिली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे परवाना विभागाची जबाबदारी होती. मात्र तेथेही अशाच प्रकारच्या तक्रारी वाढल्याने त्यांनी शिक्षण व आरोग्य असे विभाग देण्यात आले. कारलेकर हे मंत्रालय कॅडरचे असल्याने त्यांची नगरविकास विभागाच्या वरिष्ठांनी त्यांना पनवेल येथे नियुक्त केल्याचे सांगितले जाते.   

मी कोणत्याही फाईल थांबविलेल्या नाहीत. तसेच कोणाकडून कोणत्याही प्रकाराची मागणी सुद्धा मी केली नाही. मला आजच अशा आरोपांची माहिती मिळाली. – प्रसेनजीत कारलेकर, उपायुक्त, पनवेल महापालिका