नवी मुंबई : एकीकडे कोपरखैरणे येथील नवी मुंबई महापालिकेच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  (सीबीएसई) शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून दुसरीकडे नव्याने घोषणा केलेल्या दोन शाळा चालवण्यासाठी संस्थाच मिळत नसल्याने पालिका प्रशासनाची अडचण झाली आहे. या दोन शाळा खासगी संस्थांना चालवण्यासाठी देण्याचा निर्णय घेत पालिका प्रशासनाने निविदा काढली होती. प्रथम त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली. मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने गरजू व आर्थिक व दुबल घटकांतील मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  शाळांत वाढ करण्याचे धोरण केले आहे. पाच वर्षांपूर्वी सीवूड्स व कोपरखैरणे येथे दोन शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांना प्रतिसाद वाढल्याने या वर्षी आणखी दोन शाळांची घोषणा करीत तयारी केली आहे. त्यानुसार वाशी व कोपरखैरणे सेक्टर २ येथे या दोन शाळांचे नियोजन करीत प्रवेश प्रक्रियाही राबवण्यास सुरुवात केली होती.  मात्र या शाळा खासगी संस्थेमार्फत चालवण्याचे ठरवण्यात आले आहे. मात्र कोणतीही संस्था या शाळा पुढे येत नसल्याचे दिसत आहे.  यासाठी पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली होती. मात्र याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जूनमध्ये या शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. महापालिका आयुक्तांनी  या शाळा याच शैक्षणिक वर्षांपासून सुरू होतील, असे आश्वासित करीत या निविदांना मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र दुसऱ्यांदाही याला प्रतिसाद मिळाला नाही.

पालकांची अडचण

पालिकेने जाहीर केल्याप्रमाणे मोठय़ा संख्येने पालकांनी या शाळांत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून अर्ज केला आहे. प्रशासनाने जाहीर केल्या प्रमाणे उशिरा का होईना शाळा सुरू होतील म्हणून हे पालक आजही शाळेत खेटे घालत आहेत. मात्र त्यांना ठोस उत्तर मिळत नसल्याने त्यांनी इतर शाळांतही अद्याप प्रवेश घेतला नाही. मुळात या शाळेसाठी आर्थिक दुबल घटकांतील पालकांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे आता शाळा सुरू होऊन दोन महिने संपत आल्याने दुसऱ्या शाळेतही प्रवेश मिळणे अवघड असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

नवीन शाळा

  • छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय,शाळा क्रमांक ३८  सेक्टर २ कोपरखैरणे
  • शंकरराव विश्वासराव विद्यालय, शाळा क्रमांक २८, वाशी सेक्टर १५, १६

वाशी व कोपरखैरणे येथील नवीन दोन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या   सुरू करण्यावर पालिका ठाम आहे. निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देऊही प्रतिसाद मिळाला नसल्याने याबाबत आयुक्तांशी चर्चा करून  पुन्हा निविदा प्रक्रियेला मुदतवाढ द्यायची का याबाबत ठरवण्यात येणार आहे.

-जयदीप पवार, शिक्षण उपायुक्त, महापालिका

कोपरखैरणेतील शाळेत शंभर विद्यार्थ्यांना एक शिक्षक; दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

नवी मुंबई : कोपरखैरणे येथील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची   नवी मुंबई महापालिकेची शाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी शिक्षक मिळाले नसल्याने पालकांमध्ये संताप वाढला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एकाच वर्गात शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी बसवले जात आहेत.  महापालिकेने शहरातील  आर्थिकदृष्टय़ा  दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांनाही उत्तम आणि दर्जेदार शिक्षण  पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून दोन ठिकाणी केंद्रीय  मंडळाच्या शाळा पाच वर्षांपूर्वी सुरू केल्या आहेत.  सीवुड्स येथील शाळा संस्थेकडून अतिशय चांगल्या प्रकार सुरू आहे. मात्र कोपरखैरणे येथील शाळोबाबत तक्रारी वाढल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या शाळेतील वर्ग वाढले मात्र शिक्षक आहे तेवढेच राहील्याने आता एका शिक्षकाला दोन दोन वर्गाना एकत्र बसवून शिकवावे लागत आहे.

एप्रिलमध्ये शाळा सुरू झाली असून मागील तीन महिन्यांपासून केवळ तीनच तासांची शाळा भरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडत आहे. परीणामी परीक्षा घेण्याला ही विलंब होत आहे. विद्यार्थ्यांचा चाचणी परीक्षेचाही अभ्यासक्रम अपूर्ण राहिला असल्याने जुलैअखेर होणाऱ्या परीक्षा लांबवून ऑगस्टमध्ये घेण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यामुळे शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी शाळा सुरू झाल्यापासून पालकांमधून होत आहे. मात्र अद्याप शाळेला शिक्षक मिळाले नाहीत. त्यामुळे संताप वाढला आहे.

पालकांचा आंदोलनाचा इशारा

करोनानंतर प्रत्यक्षात शाळा सुरू होऊन तीन महिने लोटले आहेत. तरीही शिक्षक कमी. त्यामुळे अभ्यासक्रम मागे पडला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थीसंख्या अधिक शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शैक्षणिक संस्था जी शिक्षक भरती पुरवठा करते, यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली असून ३ ऑगस्ट अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. त्यांनतर याला कसा प्रतिसाद आहे, ते समोर येईल. 

-अभिजित बांगर, आयुक्त, महानगरपालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbse schools no response institutions new schools tenders twice ysh
First published on: 20-07-2022 at 09:22 IST