जयेश सामंत

नवी मुंबई : वाशी येथे तिसऱ्या खाडी पुलाच्या निर्मितीच्या अखेरच्या टप्प्यात कोणतीही आर्थिक अडचण उभी राहू नये यासाठी रस्ते विकास महामंडळाने पैशांची वेगाने जुळवाजुळव सुरू केली आहे. या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात ठेकेदारास ३५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पुढे करावी लागणार आहे. यासाठी सिडकोने या पुलासाठी देय असलेला २०० कोटी रुपयांचा निधी ठरवून दिलेल्या मुदतीपूर्वीच महामंडळाला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पुलाची एक बाजू लोकसभा तर दुसरी बाजू आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी पूर्ण करण्यासाठी सध्या कामाचा वेग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या कामासाठी लागणाऱ्या निधीची युद्धपातळीवर जुळवाजुळव सुरू केली असून यासाठी सिडकोला आपल्या वाट्याची रक्कम वेगाने भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी सिडकोकडून मंजूर करण्यात आलेला २०० कोटींचा हिस्सा महिन्याला १० कोटी याप्रमाणे २० हप्त्यांत देण्याचे ठरविण्यात आले होते. तसा करारही या दोन्ही प्राधिकरणांमध्ये झाला होता. मात्र वेगाने सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या कामात तातडीने निधी उभा करण्याची आवश्यकता वाटू लागल्याने उरलेला १३० कोटी रुपयांचा निधी पाच हप्त्यांमध्ये वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा >>>पनवेल शीव महामार्गावर वाहनांच्या रांगा

ऑक्टोबर २०२० मध्ये एल अॅण्ड टी कंपनीस तीन वर्षांच्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याचा कार्यादेश महामंडळामार्फत देण्यात आला. त्यानुसार ऑक्टोबर २०२३ मध्ये या पुलाचे काम पूर्ण करावे असे ठरले होते. मात्र कांदळवनांचा अडथळा, त्यासाठी लागणाऱ्या पर्यावरणाच्या मंजुऱ्या यामुळे हे काम सुरू होण्यास वर्षाचा कालावधी गेला. त्यामुळे खाडी पुलांची कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण झालेली नाहीत. करारानुसार सिडकोने महिन्याला १० कोटीप्रमाणे पैसे भरणा करावेत असा करार झाला होता. यापैकी ७० कोटी रुपये सात महिन्यांत सिडकोने भरणा केले होते.

हेही वाचा >>>उरणच्या पश्चिम विभागातील सर्व जमिनी संपादनासाठी सिडकोची पुन्हा नवीन अधिसूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिडकोकडून हप्त्यात वाढ

सिडको आणि रस्ते विकास महामंडळात झालेल्या करारानुसार सिडको आपल्या हिश्शाचे २०० कोटी रुपये या कामासाठी २० महिन्यांत देईल असे ठरले होते. प्रकल्पाच्या अखेरच्या टप्प्यासाठी तातडीने निधी लागणार असल्याने सिडकोने उर्वरित १३० कोटी रुपयांचा निधी पाच महिन्यांत पूर्ण करावा असा आग्रह महामंडळाने धरला होता. यानुसार प्रति महिना २५ कोटी रुपयांचे चार हप्ते तर ३० कोटी रुपयांचा एक हप्ता या प्रमाणात नव्या खाडी पुलासाठी देय असलेल्या रकमेचे फेरनियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिडकोमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.