नवी मुंबई : सिडकोने दोन दशकांपूर्वी कोकणभवन जवळ वसवलेल्या देखण्या अर्बन हाट अर्थात कलाग्रामची दुरवस्था झाली आहे. या अर्बन कलाग्रामच्या सभोवताली असलेल्या संरक्षक भिंती कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे बेलापूर रेल्वे स्थानक तसेच सिडको मुख्यालय परिसरकाकडे जाणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सिडको मात्र कलाग्रामच्या या दुरवस्थेकडे डोळेझाक करत आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील जवळजवळ १५ एकर क्षेत्रावर सिडकोने हे अर्बन कलाग्रामची निर्मिती केली आहे. सिडकोने करोनानंतर या कलाग्रामला अक्षरशः टाळे ठोकले आहे. राज्यातील हजारो महिला बचत गट व अनेक हातमाग कामगार यांची ही हक्काची बाजारपेठ होती. सिडकोने निर्माण केलेले हे देखणे कलाग्राम मात्र आता अखेरच्या घटका मोजत आहे. याच ठिकाणी दरवर्षी राज्यभरातील महिलांसाठी व कलाकारांसाठी मेळे घेतले जात होते. केंद्र शासन व सिडको यांच्या माध्यमातून निर्माण झालेले हे अर्बन कलाग्राम आता अत्यंत दुर्लक्षित झाले आहे.
सिडकोने नवी मुंबई फेस्टिव्हल अंतर्गत या ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामुळे या कलाग्रामला सातत्याने वर्दळ पाहायला मिळत होती. परंतु आता या कलाग्रामची पूर्ण रयाच गेली आहे. सिडकोचे सुरक्षारक्षक या ठिकाणी बसलेले असतात. परंतु कलाग्राममध्ये जाताना मोठमोठे वृक्ष उन्मळून पडलेले दिसतात. विद्युत दिव्यांची दुरवस्था झाली आहे. कारंजे बेट बकाल अवस्थेत आहे. तसेच या कलाग्रामच्या संरक्षक भिंती पडू लागल्या असून बेलापूर रेल्वेस्थानकाच्या नजिकची भिंत कोसळली आहे. कलाग्रामच्या प्रवेशद्वाराकडून आग्रोळी गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील संरक्षिक भिंतही पडली आहे.
दरम्यान, याबाबत सिडको जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांना संपर्क केला असता त्यांनी संबंधित विभागाकडून अधिक माहिती घेण्यात येईल असे सांगितले.
नवी मुंबईची निर्मिती करण्याचे काम सिडकोने केले पण त्यांनीच निर्माण केलेले अर्बन कलाग्राम आता अत्यंत दुरवस्थेत आहे. हे कलाग्रामही सिडको एखाद्या विकासकाला विकून टाकेल अशी शक्यता वाटते. प्रशासनाने पुढाकार घेऊन या कलाग्रामला गतवैभव मिळवून द्यावे, ही अपेक्षा. – दिनेश पवार, नागरिक