नवी मुंबई: नवी मुंबईत सकाळ पासून जोरदार पाऊस सुरु झाला असून तासभर विश्रांती घेत पुन्हा अकराच्या सुमारास मुसळधार पावसाळा सुरुवात झाली होती. त्यामुळे अचानक मुसळधार पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची त्रेधा उडाली. त्यात रस्त्यात खास करून स्टेशन परिसर, रिक्षा थांबा बस थांबा अशा अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने प्रवाशांना चढ उतार करताना त्रास होत आहे.
राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून नवी मुंबईतही जोरदार पावसाळा सुरवात झाली . मंगळवारी अतिवृष्टी प्रमाणे नवी मुंबईत पाऊस कोसळत आहे. शहरातून शीव पनवेल, पाम बीच, ठाणे बेलापूर महामार्ग असून अशा सर्व ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत असल्याने वाहनांच्या वेगांना ब्रेक लागत होता. तर गाडीमागील लाईट सुरु ठेवून गाड्या चालवल्या जात होत्या.
शहरात डांबरी रस्त्यात अनेक खड्डे पडले असून सर्वाधिक खड्ड्यांचा त्रास सानपाडा रेल्वे स्टेशन परिसरात होत आहे. याच स्टेशन वर आशियातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समिती संबंधित लोकांची ये जा असल्याने स्टेशन वर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. स्टेशन बाहेर एन एम एम टी डेपो आणि रिक्षा स्थानक असून दोन्ही कडे प्रचंड खड्डे पडले असून डेपोला तळ्याचे रूप आले आहे.
बस असो कि रिक्षा त्यात बसताना पाण्यातून खड्ड्यातील पाण्यातून जाणे भाग पडत असल्याने नागरिकांचा त्रास वाढला आहे. याचा सर्वाधिक त्रास गरोदर महिला, आणि जेष्ठ नागरिकांना होत आहे.खड्डे बुजवण्यात यावे असे निवेदन मनसे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी दिले होते. शीव पनवेल महामार्गावर इंदिरा नगर आणि सीबीडी उड्डाण पुलावर खड्डे असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. एक तर जोरदार पाऊस त्यात खड्ड्यात पाणी साठल्याने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने गाडी चालक सावकाश गाडी हाकत आहेत.