उरण : नगरपरिषदेचा राज्यात ४२ वा क्रमांक आला आहे. मात्र उरणच्या रस्तोरस्ती आणि गल्लीतील एवढेच काय तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीही कचऱ्याच्या राशी दिसत आहेत. त्यामुळे स्वच्छता अभियाना पुरतीच मर्यादीत मोहीम की पुढे ही सुरु राहणार असा सवाल आता उरणच्या नागरिकांकडून केला जात आहे. मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायती,नगरपालिका व महानगरपालिका यांच्यात राज्य व केंद्र सरकारकडून लाखो रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून लावून स्पर्धा भरवीत आहे. त्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थान कडून जनतेच्या कर रूपातून जमा करण्यात आलेले लाखो रुपये खर्च केले जात आहेत.

या स्पर्धा व मोहिमेचा भाग म्हणून शहरातील गल्लोगल्लीतील भिंती आकर्षक रंगाने रंगविल्या आहेत. त्यामुळे शहरातील सौन्दर्यात भर पडली आहे. मात्र अनेक वर्षे लाखो रुपये खर्च करून ही ज्या उद्देशाने या मोहिमा राबविल्या जात आहेत. ते सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे उद्दिष्ट सफल झाले आहे का हा प्रश्न अनुत्तरितच आहे.उरण सारख्या छोट्या नगरपरिषदे नेही अनेक वर्षे स्वच्छता मोहीम राबविली. राज्य व जिल्हा पातळीवर पुरस्कार ही मिळविले. मात्र त्यानंतर ही शहराची कचरा समस्या कायम आहे.

हेही वाचा : पदभार स्वीकारताच आयुक्त राजेश नार्वेकरांनी घेतला विविध कामांचा आढावा

नुकताच उरण नगरपरिषदेला राज्यात मानांकन मिळाले असतानाही उरण शहरातील गल्लोगल्लीतील कचराकुंडीत कचरा कमी होतांना दिसत नाही. एकत्र तो वेळेवर उचला जात नाही,किंवा नागरिकांकडून बेशिस्त आणि कचरा गाडी येण्याची वेळ न पाळल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. मात्र काही असले तरी नगरपरिषदेने शहरातील कचरा वेळेत उचलुन कचरा कुंडी साफ होणे आवश्यक आहे. आणि हे काम केवळ स्पर्धा किंवा मोहिमेपुतरे मर्यादित राहू नये अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.