उरण येथील जेएनपीटी ते नवी मुंबई व जेएनपीटी ते पळस्पे या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर बेकायदा कंटेनर पार्किंग सुरू होती. सध्या ही पार्कींग नेहमीच्या रहदारीच्या मुख्य रस्त्यावरही होऊ लागली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीच्या समस्येबरोबरच अपघातांची शक्यता वाढली आहे.

जेएनपीटी बंदरावर आयात निर्यात होणाऱ्या मालाची साठवणूक करण्यासाठी उभारण्यात आलेले गोदामे आहेत. या गोदमातून मालाची ने-आण करण्यासाठी गोदामांच्या अंतर्गत रस्त्यात वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. या रांगा तीन चार किलोमीटर पर्यंत लांबीच्या असतात. त्यामुळे गोदामात ये-जा करणेही अवघड होऊन बसते. ही स्थिती उरण मधील जवळपास १५० पेक्षा अधिक खाजगी व केंद्र सरकारच्या केंद्रीय भांडारण विभाग (सी.डब्ल्यू.सी.)गोदामांच्या परिसरात पहायला मिळते. त्याचप्रमाणे नव्याने रुंदीकरण करण्यात आलेल्या उरणला व जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील नागरीकांच्या व प्रवासी वाहनांसाठी उभारण्यात आलेल्या सेवा (सर्व्हिस)मार्ग तर जणू काय कंटेनर वाहनाच्या पार्किंगसाठीच बनविण्यात आली आहेत अशी स्थिती आहे. त्यामुळेच या मार्गावरील गावांना जोडणाऱ्या या मार्गावरून प्रवास करण्या ऐवजी सर्व प्रवासी वाहने मुख्य मार्गावरून प्रवास करीत आहेत. याचा फटका येथील प्रवासी विशेषतः दुचाकी वाहनचालकांना बसत असून याच मार्गावर अनेक दुचाकी चालकांचे अपघात झाले आहेत. या विरोधात स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक संस्थांनी वारंवार मोर्चा, निवेदने, आंदोलने करूनही वाहतूक विभाग,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या कडूनही दुर्लक्ष केलं जातं आहे.

हेही वाचा… नवी मुंबई : पोटच्या गोळ्याला कचऱ्यात फेकून देणाऱ्या आईला नातेवाईकांसह अटक

ही समस्या असतांना सध्या याच मार्गावरील करळ ते तरघर व करळ ते कलंबोली मार्ग या दोन्ही मार्गाच्या दुतर्फा कंटेनर वाहने उभी केली जात आहेत. रात्रंदिवस आशा प्रकारची वाहन उभी केली जात असल्याने अपघातात वाढ होऊ लागली आहे.

हेही वाचा… सूर्यनारायणाच्या अस्तानंतरही पथदिवे बंदच; नवी मुंबईत नागरिकांकडून संताप व्यक्त

उरण कोस्टल रस्त्यावर कंटनेर पार्किंग

जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावरून उरणला जोडणाऱ्या कोस्टल रस्त्यावर भेंडखळ येथील गोदामात माल घेऊन येणाऱ्या कंटेनर वाहनांची दोन किलोमीटरची रांग लागली आहे.आधीच या मार्गवरून येणाऱ्या वाहनांमुळे दररोजच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यात या रस्त्यावर कंटेनर उभी करण्यात येऊ लागल्याने अधीकची भर पडली आहे. सध्या खोपटा मार्गाला जोडणाऱ्या या मार्गावर कंटेंरच्या रांगा लागल्या असून या रांगात रात्रंदिवस वाट पहावी लागत असल्याची माहिती कंटेनर वाहन चालकाने दिली आहे.

हेही वाचा… ‘पोलिसां’ची उल्लेखनीय कामगिरी, अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचा सहा दिवसात शोध

गोदामांच्या अंतर्गत वाहनतळाची कमतरता

उरण मधील बहुतांशी गोदामात माल घेऊन येणाऱ्या किंवा रिकाम्या होणाऱ्या कंटेनर वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्थाच नसल्याने किंवा कमी क्षमतेची वाहनतळ असल्याने ही वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत.याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.