scorecardresearch

नवी मुंबई पोलिसांसाठी सायबर क्राईम ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या पुढाकाराने नवी मुंबई पोलिसांना सायबर गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

Cyber ​​Crime Training Navi Mumbai Police
नवी मुंबई पोलिसांसाठी सायबर क्राईम ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

नवी मुंबई : तंत्रज्ञानाचा विकास झाल्यावर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी त्याचा फायदा घेणे सुरू केले. सामान्य लोकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांना सायबर प्रशिक्षण आवश्यक झाले आहे. हिच निकड लक्षात घेत गुन्हेगारी रोखण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या पुढाकाराने नवी मुंबई पोलिसांना सायबर गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

भारतीय विद्या भवन यांच्या केएम मुंशी इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज तर्फे नवी मुंबई पोलिसांसाठी पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण २७ मार्च ते ३१ मार्चदरम्यान होणार आहे. डिजिटल फॉरेन्सिक अ‍ॅण्ड सायबर क्राईम ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून नवी मुंबई पोलिसांना सायबर क्राईमच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज पार पडले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सायबर क्राईमच्या गुन्ह्यात होणारी वाढ लक्षात घेऊन नवी मुंबई पोलिसांसाठी या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. नवी मुंबईतील चाळीस पोलिसांना हे प्रशिक्षण देण्यात येणार असून, यात दोन परिमंडळमधील प्रत्येकी १५ आणि सायबर सेलमधील १० अशा चाळीसजणांना प्रशिक्षित केले जाणार आहे. 

हेही वाचा – नवी मुंबई : भाजी आणणे पडले महागात; काही वेळातच घरफोडी 

हेही वाचा – नवी मुंबई : सीरियातील तरुणीशी मैत्री पडली महागात; वाचा नेमका काय आहे प्रकार? 

सायबर गुन्हेगारांचे अवलोकन केले असता त्यातील बहुतांश गुन्हेगार हे किशोरवयीन आहेत, तसेच अल्प शिक्षित असून भावनिक साद आणि तंत्रज्ञानातील त्रुटी (लूप हॉल) शोधून गुन्हे केले जात आहेत. प्रशिक्षणात मागोवा काढणे, आणि गुन्हेगाराचे स्थळ शोधणे यावर जास्त भर देण्यात येत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात एक सायबर कक्ष असून, अनेक छोटी प्रकरणे तिथेच सोडवली जातील आणि अत्यंत क्लिष्ट प्रकरणे विशेष सायबर सेलकडे वर्ग केली जातील, अशी माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्य मिलिंद भारंबे यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 17:56 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या