नवी मुंबई : अमली पदार्थ विक्रीची साखळी उद्धवस्त व्हावी यासाठी नवी मुंबई पोलिसांनी गेल्यावर्षभरात वेगवेगळ्या मोहीमा आखल्या असल्या तरी मुंबई महानगर प्रदेशात कृषी मालाचा पुरवठा करणाऱ्या वाशीतील सर्वात मोठ्या बाजारपेठांमध्ये अमली पदार्थ विक्रीची मोठी साखळी कार्यरत असल्याचा आरोप बुधवारी या भागात कार्यरत असलेल्या माथाडी नेत्यांनी केला. कृषी मालाच्या पाचही बाजारपेठांमध्ये अवैध धंदे फोफावले आहेत आणि ते रोखण्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे, असा गंभीर आरोप माथाडी नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
याबाजारपेठांमध्ये विदेशातून येणाऱ्या मालाची कोणतीही तपासणी केली जात नाही, या कृषी मालासोबत आणखी काय येते यावर कोणाचेही नियंत्रण नाही. तसेच बाजारपेठांमध्ये फोफावलेल्या गुंडगिरीमध्ये स्थानिक पोलीस दुर्लक्ष करत आहे असा आरोपही नरेंद्र पाटील यांनी केला. या बाजारांमध्ये अमली पदार्थ खरेदी विक्रीचे अनेक अड्डे आहेत, या ठिकाणी मोठ्याप्रमाणात बांगलादेशींचे वास्तव्य आहे. हे बेकायदा धंदे बंद करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी येथे विशेष पोलीस पथकाची स्थापना करावी अशी मागणीही नरेंद्र पाटील यांनी यावेळी केली. माथाडी कामगारांची संघटना स्थापन करून याद्वारे गुंडगिरी केली जात आहे. या गुंड नेत्यांमुळे माथाडी चळवळ बदनाम केली जात आहे. माथाडी कामगारांच्या नावाने संघटना स्थापन करुन गुंडगिरी करणाऱ्यांवर नियंत्रण आणणारा कायदा करावा अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली.
पोलिसांचे प्रयत्न निष्फळ?
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांनी गेल्या वर्ष-दीड वर्षांत शहरातून अमली पदार्थांची साखळी पुर्णपणे मोडीत काढण्यासाठी प्रभावी उपाय आखले आहेत. या साखळीचा एक भाग असलेल्या नायजेरियन नागरिकांना अटक करुन त्यांना त्यांच्या देशात पाठविणे, अमली पदार्थांच्या तस्करांना अटक करणे या सारख्या मोहीमा नवी मुंबई पोलिसांना राबविल्या आहेत. नवी मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यवसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येनंतर अमली पदार्थांच्या व्यवसायाचा मुद्दा शहरात पुन्हा एकदा चर्चेस आला आहे. या घटनेनंतर विदेशी गांजा आणि कोकेन आयात प्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेचे दोन पोलीस कर्मचारी, एक राष्ट्रीय हाॅकीपटू यांच्यासह १० जणांना अटक केली आहे. नवी मुंबई पोलीस एकीकडे सातत्याने अमली पदार्थ विरोधी कारवाई करत असताना एपीएमसी सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये ही साखळी कार्यरत असल्याचा आरोप करत नरेंद्र पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सर्वाधिक माथाडी वर्ग राहतो. या ठिकाणी रुजू झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने अमली पदार्थ विरोधी कारवाई केल्या असतील तर हा धंदा अचानक सुरु झाला का, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. एपीएमसीच्या बाजार आवारांमध्ये हा धंदा कसा वाढीस लागला असा सवाल करत तत्त्कालीन पोलीस निरीक्षक आणि साहाय्यक आयुक्त नेमके काय करत होते, असा सवालही नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला. दरम्यान पाटील यांच्या आरोपांवर नवी मुंबई पोलिसांकडून रात्री उशीरापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती.