पनवेल : दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या पहाटे आनंदाचे वातावरण काळवंडवणारी एक भीषण दुर्घटना कामोठे उपनगरात घडली. सेक्टर ३६ येथील अंबे श्रद्धा इमारतीत झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटात मायलेकींचा आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळून मृत्यू झाला. पहाटेच्या शांततेला चिरत झालेल्या या स्फोटाने परिसर हादरला. मदतकार्य काही वेळात पोहोचले असले तरी काही क्षणांतच दोन निरागस जीव आगीत गमावले गेले. पोलिस आणि नागरिकांनी धैर्याने पुढाकार घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले, तर अग्निशमन दलाने स्फोटानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झुंज दिली. दिवाळीच्या मंगलमय क्षणी घडलेली ही दुर्घटना कामोठेकरांसाठी काळीज पिळवटून टाकणारी ठरली. 

मंगळवारी (ता.२१ ऑक्टो.) पहाटे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कामोठे उपनगरातील सेक्टर ३६ येथील अंबे श्रद्धा या इमारतीमध्ये झालेल्या दुर्घटनेत मायलेकी सिलेंडर स्फोटातील आगीच्या ज्वालांमध्ये होरपळून त्या दोन्ही जिवांचा बळी गेला. मदतकार्य काही वेळेत पोहचल्याचा दावा अग्निशमन दलाचे अधिकारी मनिष ब्राम्हणकर आणि पनवेल अग्निशमन दलाचे अधिकारी प्रविण बोडखे यांनी केला. या घटनास्थळी अग्निशमन जवानांचे पथक पोहचण्यापूर्वी कामोठे पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहचले होते. या कर्मचा-यांमध्ये महिला पोलीस हवालदार उर्मिला बोराडे आणि पोलीस शिपाई प्रविण मालुसरे यांनी आगीची माहिती मिळताच या इमारतीकडे धाव घेतली. ही घटना कशी पोलिसांना समजली आणि पोलिसांचे पहिले मदतकार्य अंबे श्रद्धा या इमारतीमध्ये नेमके सुरूवातीच्या काही मिनिटात कसे सुरू झाले याची माहिती याच दोन कर्तव्यदक्ष पोलिसांनी लोकसत्ताला दिली.अपघात किंवा आपत्तीवेळी मदतकार्यासाठी सुरूवातीचे पहिले काही मिनिटेच महत्वाची असतात.

अशाच थरार मंगळवारी सकाळी कामोठे येथील अंबेश्रद्धा या अकरा मजली इमारतीमधील नागरिकांनी अनुभवला. साडेपाच ते पावणेसहा या दरम्यान ही आग लागली असावी असा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिका-यांकडून वर्तवला जात आहे. कामोठे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही इमारत आहे. आगीपूर्वी धूराचे लोट सिसोदीया यांच्या घरातून बाहेर पडताना दिसू लागल्यानंतर रस्त्यावरून येणारे व जाणा-या नागरिकांनी आरडाओरड सुरू केला. पोलीस ठाण्याशेजारी असणा-या फुलविक्रेत्या महिलेने पळत येऊन या आगीची घटना पोलीस ठाण्यातील कर्मचारी हवालदार बोराडे व मालुसरे यांना सांगितले. रात्रपाळीला संपुर्ण पोलीस ठाण्यात १० कर्मचारी व अधिकारी असल्याने निम्या कर्मचा-यांनी थेट आग लागलेल्या इमारतीपर्यंत धाव घेतली. तोपर्यंत रस्त्यावरून येजा करणारे नागरिक इमारतीमध्ये शिरून सर्वांच्या घराच्या डोअरबेल वाजवून उठवत होते.

सकाळच्या वेळी इमारतीचा रखवालदार किंवा कचरावाला बेल वाजवतोय असे वाटल्याने सुरूवातीला या इमारतीमधील रहिवाशांनी या पहिल्या डोअर बेलकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पोलीस स्वता इमारतीमध्ये ३०१ या सदनिकेत आग लागल्याने त्या विंगमध्ये शिरून इतर रहिवाशांना खाली उतरण्याचा सल्ला देत होते. काही रहिवाशांना नेमके काय झाले हे कळत नसल्याने अनेकांनी इमारतीबाहेर जाण्यास नकार देत होते. पोलिसांनी आवाज चढवल्यानंतर काही तरी आपत्ती घडल्याचा भास रहिवाशांना झाला. तोपर्यंत महिला पोलीस हवालदार उर्मिला व पोलीस शिपाई प्रविण यांनी आग लागलेल्या घराचा दरवाजा ठोठावला मात्र आतून काही प्रतिसाद न आल्याने त्यांनी ३०१ सदनिकेशेजारी असणा-या सदनिकेतील जेष्ठ नागरिक व बालकांना घेऊन खाली जात असताना मोठा स्फोट झाला. जोराचा दणका होऊन तो मजलाच हादरल्याने काहीतरी मोठा आघात सिसोदिया यांच्या घरात झालाय याची खात्री पोलिसांची झाली होती. स्फोटाची आवाज घुमत असताना सुद्धा पोलिसांनी इमारती रिकामी करण्यासाठीचे प्रयत्न सुरूच ठेवले.

दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी १९ वर्षीय पायल आणि तीची ४५ वर्षीय आई रेखा या आल्या होत्या. स्फोटाची मालिका सुरू असताना अग्निशमन दल तेथे पोहचले होते. अग्निशमन अधिकारी ब्राम्हणकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दरवाजा तोडून त्यांनी सिसोदियांच्या घरात प्रवेश केला. तर दूसरे जवान तीस-या मजल्यावरून बाहेरच्या बाजूने खिडकीवाटे प्रवेश करण्यासाठी कसरत करत होते. पाण्याचा मारा सुरू असताना काही मिनिटांत जवान सिसोदीया यांच्या घरात शिरले त्यावेळेस दोन्ही मायलेकी आगीत खाक झाल्याचे त्यांना आढळले. या स्फोटात लोखंडी सिलेंडरचे तुकडे झाले आहेत. हे तुकडे पाहुन पनवेल महापालिका अग्निशमन अधिकारी प्रविण बोडखे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे स्फोटापूर्वी २० मिनिटे हे सिलेंडर आगीच्या भक्ष्यस्थानी असतील त्यामुळे हे स्फोट झाल्याची शक्यता अधिकारी बोडखे यांनी वर्तविली आहे. या घटनेनंतर महानगर घरगुती गॅसची जोडणी असणा-या इमारतीमध्ये दोन सिलेंडर का ठेवले अशी चर्चा जोरदार सुरू झाली. सिसोदीया कुटूंब हे काही दिवसांनी कामोठे येथील स्थलांतरीत होणार असल्याने त्यांनी महानगर गॅसची जोडणी न घेता घरगुती गॅस सिलेंडरवरून स्वयंपाक बनवत असल्याची माहिती पोलिसांपर्यंत येथील रहिवाशांनी दिली.

मूळचे राजस्थान येथील असणारे सिसोदिया कुटूंबाचे प्रमुख या रेखा या स्वता होत्या. दोन मुली आणि एक मुलगा असा हा परिवार अंबे श्रद्धा या इमारतीमध्ये राहत होता. रेखा यांची अजून एक २२ वर्षांची मुलगी रात्रपाळीला नोकरीवर गेली होती आणि मुलगा याच इमारतीमधील एका कुटूंबासोबत खोपोली येथे मुक्कामी गेला होता. हे दोघे मंगळवारी पहाटे घरी नसल्याने ते या दुर्घटनेतून वाचल्याचे कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी सांगीतले. या दरम्यान स्फोटातील दुर्घटनेची माहिती मिळताच, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे आणि अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे यांच्यासह आ. प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली. रेखा आणि पायल यांच्या होरपळलेल्या पार्थिवाला त्यांच्या मूळ गावी राजस्थान येथे पोहचविण्यासाठी पनवेल महापालिकेच्या शववाहिनीची सोय करण्यात आली. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिडवे यांनी पोलीस हवालदार बोराडे आणि मालुसरे यांनी वेळीच केलेल्या मदतकार्यामुळे समाधान व्यक्त केले. मात्र बोराडे यांना याविषयी विचारल्यावर मदतकार्यात त्या दोघांना वाचवू न शकल्याची खंत राहील्याचे सांगितले.