उरण : शनिवारी दुपारी अवघी पंधरा मिनिटे झालेल्या मुसळधार पावसाने उरणच्या नालेसफाई आणि आपत्ती व्यवस्थापनाची पोलखोल केली आहे. या पावसामुळे उरण शहरासह तालुक्यातील अनेक परिसरात तीन ते चार फूट पाणी साचल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. ही स्थिती उद्भवण्यास येथील प्रशासन जबाबदार असून त्यांच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आलेल्या पावसामुळे शहर आणि ग्रामीण परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. या पावसामुळे उरण शहरातील मुख्य मार्गावर तीन ते चार फुटांचे पाणी भरले. शहरातील रस्त्यावरील चारचाकी व दुचाकी वाहने या पावसात वाहू लागली होती. तसेच उरण शहरातील बोरी-शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरण-मोरा येथील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. वैष्णवी हॉटेल ते कुंभारवाडा, आपला बाजार, साठे हॉटेल, गणपती चौक, पालवी हॉस्पिटल, खिडकोली नाका आदी परिसरातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.

उरण शहराला जोडून असलेल्या नागाव काठे आळीमध्ये रस्ता आणि नाला एकच झाला होता. उरण येथील ओएनजीसी प्रकल्प आणि द्रोणागिरी डोंगरातून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात नागावमध्ये येत असल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. तर जासई, रांजणपाडा, चिर्ले, नवघर, पागोटे, कुंडेगाव, बोकडवीरा आदी गावांतील रस्त्यांवरही पावसाचे पाणी साचले होते. शहरातील काही रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरातील सातरहाटी येथील खेळाचे मैदानही तुडुंब भरले होते.

राष्ट्रीय महामार्गही पाण्याखाली

जेएनपीए-नवी मुंबईला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १०० कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या जासई उड्डाणपुलाच्या खालील दोन्ही बाजूच्या सेवा मार्गावर पावसाचे गुडघाभर पाणी साचत असल्याने हलक्या वाहनांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. या मार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर झालेली अवैध बांधकामे, नैसर्गिक नाले, गटारे बुजल्यानेच ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यात प्रामुख्याने मार्गाच्या दोन्ही बाजूला उभारलेले अनधिकृत कंटेनर यार्ड, विविध दुकाने, टपऱ्या, दुकाने याच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड बांधले आहेत. एक सर्व्हिस रोड गव्हाण, कोपर, न्हावा, गव्हाण फाटा आदी गावांकडे जातो, तर दुसरा चिर्ले, रांजणपाडा, दास्तान, वेश्वी, धुतुम व इतर गावांना जोडला जात आहे.

आपत्ती व्यवस्थापनाची बैठक मे महिन्यात घेण्यात आली आहे. या बैठकीत सिडको, जेएनपीए तसेच उरण नगर परिषदेला नालेसफाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. – डॉ. उद्धव कदम, तहसीलदार, उरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरण शहरात शनिवारी झालेला पाऊस हा काही मिनिटे होता. त्यानंतर साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला. त्या वेळी कोणी तरी मातीचा भराव टाकल्याने ही स्थिती उद्भवली होती. ती दूर करण्यात आली असून नालेसफाईही करण्यात येणार आहे. – समीर जाधव, मुख्याधिकारी, उरण नगर परिषद