पूनम सकपाळ

करोनामुळे पालिकेचा वार्षिक खर्च २३०८ कोटींवर

नवी मुंबई : करोना संकटामुळे नवी मुंबई महापालिकेच्या या वर्षीच्या वार्षिक खर्चात ४७५ कोटींची वाढ होत तो २३०८ कोटींवर पोहचला आहे. तर यापैकी १९३ कोटी १४ लाख फक्त आरोग्य सुविधांवर खर्च करण्यात आले आहेत. तर गेल्या वर्षी आरोग्यासाठी ६५ कोटी असा दोन वर्षांत २५८ कोटींचा खर्च झाला आहे.

करोना संकटामुळे राज्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. इतर सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत. कमी उत्पन्न असलेल्या महापालिकांपुढे तर पुढील काळात आरोग्य सुविधा कशा पुरवायच्या हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

नवी मुंबई महापालिका ही त्या तुलनेत आर्थिकदृष्टय़ा सक्षम महापालिका असल्याने प्रशासन गेली दोन वर्षे उत्पन्नाच्या जीवावर या संकटाला तोंड देत आहे. गेल्या वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत पालिकेने आरोग्यावर ६५ कोटी इतका खर्च केला होता. यात दुसऱ्या लाटेत मोठी वाढ झाली असून तो १९३ कोटींवर गेला आहे. त्यामुळे पालिकेच्या वार्षिक खर्चातही वाढ झाली आहे. सन २०१९-२० मध्ये एकूण १८३३ कोटी असलेला वाषिर्क खर्च सन २०२०-२१ मध्ये २३०८ कोटींवर गेला आहे.  शहरात १५ मार्च २०२० रोजी करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये संसर्ग अधिक पसरला. त्यामुळे पालिका प्रशासनाने इतर खर्च वगळून आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे मागील वर्षी मार्च व एप्रिल या दोन महिन्यातच ११ कोटींचा खर्च केला होता, तर वर्षभरात ६५ कोटींवर खर्च गेला होता.

करोनाची दुसरी लाट ही यावर्षी एप्रिलपासून सुरू होत शहरात प्रचंड वेगाने संसर्ग पसरला. महिनाभरात शहरात पहिल्या लाटेत निर्माण केलेल्या आरोग्य सुविधाही कमी पडल्या. त्यामुळे प्रशासनाला आरोग्य सुविधा मोठय़ा प्रमाणात निर्माण कराव्या लागल्या. तसेच या लाटेत प्राणवायूचीही मोठी गरज भासली. त्यात करोना लसीकरण जानेवारीपासून सुरू झाल्याने यासाठी खर्च वाढत गेला. यावर्षी मार्च व एप्रिल या दोन महिन्यात ४९ कोटी ५० लाख इतका खर्च झाला असून वर्षभरात तो १९३ कोटी १४ लाखांवर गेला आहे.