नवी मुंबई : शहरातील सिग्नलवर गजरे, फुले आणि अन्य वस्तू विकणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेरुळमध्ये नवी मुंबई महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या पुढाकाराने पहिली सिग्नल शाळा सुरू करण्यात आली आहे. ठाण्याच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या शाळेमुळे रस्त्यावरची मुले आता शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करू लागली आहेत. विशेष म्हणजे, या शाळेत ४५ विद्यार्थी सध्या शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांचे वर्ग महापालिकेच्या शाळेत भरवले जात असल्याची माहिती सिग्नल शाळेच्या व्यवस्थापकांनी दिली.

समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिकेने काही वर्षांपूर्वी ठाणे शहरातील तीन हात नाका जवळ सिग्नल शाळा सुरू केली होती. तीन हात नाका आणि आजूबाजूच्या परिसरातील शाळाबाह्य मुलांना या शाळेचा फायदा झाला. अनेक विद्यार्थी या शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. आता, त्याच धर्तीवर समर्थ भारत व्यासपीठ यांनी नवी मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने नेरुळ येथे सिग्नल शाळा सुरू केली आहे.

जून २०२५ या शैक्षणिक वर्षापासून ही शाळा सुरू झाली आहे. सद्यस्थितीला या शाळेत ४५ विद्यार्थी शिक्षण घेत असून यात, २५ मुली आणि २० मुलांचा समावेश आहे. यामध्ये २७ बालावाडीचे विद्यार्थी आहेत. तर, पहिली ते चौथी इयत्तेत शिक्षण घेणारे दहा आणि पाचवी ते सहावी इयत्तेत शिक्षण घेणारे सात ते आठ विद्यार्थी आहेत. महापे सिग्नल, घणसोली स्थानक, तेरणा महाविद्यालय परिसरातील या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यापूर्वी त्यांच्या पालकांचे समुपदेशन करावे लागले. शाळेची बस दररोज या मुलांची ने-आण करते. दररोज शाळेत ८० टक्के विद्यार्थी येत आहेत. हे विद्यार्थी सोय नसल्याने अंघोळी शिवायच शाळेत येत असतात. अशावेळी संगोपक ज्या विद्यार्थ्यांनी अंघोळ केलेली नाही त्यांना अंघोळ घालून व्यवस्थित तयार करतात. मुलांना एकत्रित नाश्ता दिला जातो. मग शैक्षणिक वर्ग सुरू केले जातात.

शैक्षणिक अभ्यासक्रमासह या मुलांना समाजात मोकळेपणाने वावरता यावे यासाठी या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर अधिक भर दिला जात आहे. या शाळेत आठवड्यातून एक दिवस मानसोपचार तज्ज्ञांना बोलावले जाते, अशी माहिती नेरुळ येथील सिग्नल शाळेचे प्रकल्प समन्वयक संतोष धुमक यांनी दिली.

पालिकेच्या शाळेत वर्ग

ठाणे शहरात तीन हात नाका सिग्नलजवळ पुलाखाली जशी शाळा सुरू केली. त्याचपद्धतीने नवी मुंबई शहातील महापे येथे सिग्नलजवळील पुलाखाली शाळा सुरू करण्याचा संस्थेचा प्रयत्न होता. परंतु, नवी मुंबई महापालिकेने पुलाखाली शाळा सुरू करण्याऐवजी पालिकेच्या एखाद्या शाळेतच शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानुसार, नेरुळ सेक्टर ४ येथील शाळा क्रमांक १०२ मध्ये सिग्नल शाळा भरवली जाते. ही शाळा तळ अधिक दोन मजली आहे. त्यामुळे या शाळेतील तळ मजल्यावरील पाच वर्ग सिग्नल शाळेकरिता दिले आहेत. या सिग्नल शाळेत चार शिक्षिका, दोन संगोपक, दोन सफाई कर्मचारी, दोन सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत.

समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिकेने काही वर्षांपूर्वी ठाणे शहरातील तीन हात नाका जवळ सिग्नल शाळा सुरू केली होती. त्याच धर्तीवर समर्थ भारत व्यासपीठ यांनी नवी मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने नेरुळ येथे सिग्नल शाळा सुरू केली आहे.