उरण : शनिवारी (२६ जुलै) ला अलिबागच्या खांदेरीच्या परिसरात करंजा येथील एक बोट बुडाल्या नंतर रात्री उशिरा मोरा बंदरात खालाशाना घेऊन येणाऱ्या छोट्या बोटीला अपघात झाला असून यात एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. सुरेश गौतम(२२) असं या खलाशाच नाव असून तो उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहे.

या संदर्भात मोरा सागरी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तर मृत खलाशाचा मृतदेह उरणच्या इंदिरा गांधी रुग्णालयात नेण्यात आला आहे. शनिवारी रात्री ओहटीच्या वेळी मोरा बंदराच्या नजीक असलेल्या मोरा मुंबई रो रो च्या जेट्टी जवळ मोठी मासेमारी बोट उभी करण्यात आली होती. या बोटीच्या दुरुस्ती साठी काही कारागीर छोटी बोट घेऊन गेले होते. ते रात्रीच्या वेळी परतत असतांना समुद्राला आलेली भरती आणि वादळी वाऱ्याने ही सहा ते सात जणांना घेऊन किनाऱ्यावर येणारी बोट उलटली.

त्यातील पाच जण पोहून किनाऱ्यावर आले. मात्र एकाला पोहतांना दम लागल्याने तो भरतीच्या मोठ्या लाटेत बुडाला. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी किनाऱ्यावर लागल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.

मोरा बंदरातील बोट दुर्घटनेतील मृत हा सुतार काम करणाऱ्याच्या हाताखाली काम करणारा मजूर होता. त्याला जास्त पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास मोरा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन सोनवणे हे करीत आहेत.

अलिबागच्या किनाऱ्यावरील बोट करंजा मधील : अलिबागच्या खांदेरीच्या किल्ल्या नजीक बुडालेली मच्छिमारी बोट ही उरणच्या करंजा येथील आहे. या बोटींवरील तीन खलाशी अजूनही बेपत्ता असून त्यांचा पोलीस आणि सागरी सुरक्षा दलाकडून शोध सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंदी काळातील मासेमारीचा परिणाम : सरकारने जून व जुलै या दोन महिन्यासाठी खोल समुद्रातील मासेमारी बंदी घातली आहे. ती येत्या चार दिवसांवर आली आहे. मात्र बंदी काळ असतांनाही मासेमारी बोटी समुद्रात उतरवल्या जात असल्याने मच्छिमारांच्या जीवाला धोका वाढला आहे.