पनवेल : नवी मुंबईतील लाखो तरुणाईला नशेच्या खाईत लोटणाऱ्या अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणामध्ये आणखी चार तरुणांना नवी मुंबईतील उलवे, कळंबोली आणि नेरुळ या विविध उपनगरांमधून मागील पाच दिवसांत नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. अटकेत असलेले हे तस्कर मुख्य विक्रेत्यांकडून ड्रग्ज घेऊन तरुणांपर्यंत पुरवठा करत होते.
नवी मुंबईतील पोलीस कर्मचारी, ड्रग्ज तस्कर आणि सीमाशुल्क अधीक्षक यांच्या संगनमताने सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करीने नवी मुंबईला हादरुन सोडले. या प्रकरणातील मुख्य दोन आरोपी अजूनही परदेशात लपून बसले असून सध्या या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची संख्या १४ वर पोहचली आहे. मागील पाच दिवसात चार तरुणांना अटक केल्यावर त्यांच्याकडून अमली पदार्थाचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. मात्र अजूनही तपास सुरू असल्याने अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संदीप निगडे यांनी अमली पदार्थाचा नेमका किती साठा जप्त केला याची माहिती दिली नाही.
स्वत:च्याच मृत्यूचा बनाव. के.के.चे प्रताप
खारघरच्या एसबीआय बँके शेजारी मोमोज विक्रीचा व्यवसाय करणारा के.के. याचे नेहमी शेजारच्या व्यापा-यांसोबत तंटे होत असत. शेजारच्या व्यापा-यांवर वचक निर्माण करण्यासाठी तो पोलिसांची मदत मागत असे. तस्करीतील सहभागामुळे मोमोज विक्री सोबत के.के. याचे अनेक प्रताप यानिमित्ताने उघड झाले.
के. के. याला गुजरात पोलिसांनी केलेल्या अटकेमुळे तो पहिल्यांदा तो खारघर पोलीस ठाण्यात चर्चेत आला. के.के. याने स्वताचा मृत्यू झाल्याची खोटा बनाव रचला होता. गुजरात येथील सिद्धी क्लिनिकच्या डॉक्टरकडून त्याने बोगस मृत्यू प्रमाणपत्र मिळवले. त्यानंतर उमरा येथील रामनाथ घेला स्मशानभूमीतून त्याने मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची पावती मिळवली. या कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने सुरत महानगरपालिकेत मृत्यूची नोंद केली. त्यानंतर एलआयसी विमा कंपनीकडून त्याने मुलाच्या नावावर ३२ लाखांची विम्याची रक्कम मिळवली. संबंधित विमा कंपनीच्या हे ध्यानात आल्यावर त्यांनी याबाबत एप्रिल २०२१ मध्ये सूरतमधील लालगेट पोलीस ठाण्यात के.के. विरोधात गुन्हा नोंद केला. त्याच्यासह त्याच्या मुलाला अटक करण्यासाठी गुजरात पोलीस खारघर येथे आले होते. त्यावेळेस खारघर पोलिसांना के.के.चा प्रताप समजला. बनाव उघड झाल्याने के. के. याला एलआयसीची रक्कम परत करणे भाग पडले.
के.के. याच्याकडे नवी मुंबईच्या विशेष पोलीस पथकाला चार वेगवेगळ्या नावाची आधारकार्ड सापडले. याच आधारकार्डच्या साह्याने तो सीमा शुल्क विभागातून अमली पदार्थाचे पार्सल मागवत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. के.के.सोबत सतत संपर्कात असल्याने पोलीस सचिन भालेराव सुद्धा या प्रकरणात अडकला.
मोमो विक्रेता मुख्य सूत्रधार
या तस्करीचे मुख्य सूत्रधार ५६ वर्षीय के. के. उर्फ कमल जयकिशन चांदवाणी आणि सुजीत बंगेरा हे आहेत. दोन वर्षांपूर्वी खारघरमध्ये मोमोज् विक्री करणारा के.के. याचा ड्रग्जच्या तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचे समजताच के.के. ला ओळखणारे खारघरवासीय अवाक झाले आहेत. के. के. याचे अनेक लोकप्रतिनिधींसोबत विविध कार्यक्रमातील छायाचित्रे सध्या पसरत आहेत. २ मे रोजी के.के. आणि सुजीत बंगेरा यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.