पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील धाकटा व मोठा खांदा या गावाने ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा तालुक्यात पहिल्यांदा सुरू केली. दीडशे वर्षांपासून जास्त काळ या परंपरेनंतर मोहो आणि रिटघर या गावांनीसुद्धा याच परंपरेचा धागा पकडला. सध्या मोहो गावात ७२ वर्षांपासून आणि रिटघर गावात ५१ वर्षांपेक्षा जास्त काळ या परंपरेनुसार गणेशोत्सव साजरा केला जात आहे. तालुक्यात सध्या या चार गावांच्या एकात्मिक गणेशोत्सवाचे कौतुक होत आहे.
खांदेश्वर कॉलनीचे नामकरण याच खांदेश्वर गावावरून झाले आहे. खांदेश्वर गावाचे दोन भाग म्हणजे धाकटा व मोठा खांदा ही गावे. येथे दोन गाव एक गणपती परंपरा अनेक वर्षांपासून साजरी केली जात आहे. गावातील स्वयंभू गणेश मंदिरामुळे येथील गावकऱ्यांनी दोन गाव एक गणपती ही परंपरा स्वीकारली. वेगवेगळे एकात्मिक सण साजरा करू याच धार्मिक भावनेने ही मंडळी प्राणप्रतिष्ठापासून ते आरती व जागरण या सगळ्या विधींसाठी गावातील सारे एकाच मंदीरात एकत्र येतात.
भजन, कीर्तन, भारूड तसेच पारंपरिक नृत्याचे कार्यक्रम येथे आयोजित केले जातात. याच पद्धतीने ७२ वर्षांपासून मोहो गावात एक गाव एक गणपती ही परंपरा येथील ग्रामस्थांनी जोपासली आहे. पर्यावरणपूरक सजावट असल्याने ही आरास बनविण्यासाठी गावातील तरुण वर्ग अनेक दिवस काम करताना दिसतात. या उत्सवातून सामाजिक ऐक्य आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश ही परंपरा मोहो गाव जपत आहे. रिटघर गावच्या एक गाव एक गणपती या परंपरेला यंदा ५१ वर्षे झाल्याने येथील ग्रामस्थांमध्ये वेगळा आनंद आहे. १९७५ सालच्या दुष्काळामुळे त्यावेळच्या गावकऱ्यांनी अवाजवी खर्चाला फाटा देण्यासाठी ही प्रथा सुरू केली. गावातील हनुमान मंदिरामध्ये गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.
वैद्यकीय चिकित्सा शिबीर, भजन, हरिपाठाचा उपक्रम
वैद्यकीय चिकित्सा शिबीर, भजन हरिपाठ यासारखे उपक्रम गावकरी राबवत असल्याने गेल्या वर्षीचा नवी मुंबई पोलीस दलाचा उत्कृष्ट गणेशोत्सव म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक या गावाला देऊन पोलिसांनीसुद्धा त्यांचा सन्मान केल्याची माहिती या गावचे माजी सरपंच भारत भोपी यांनी सांगितले. या गावचे सरपंच सुभाष भोपी यांनी दिलेल्या माहितीनूसार एमजीएम रुग्णालयाच्या सहकार्याने गावात दोन वेळा गणेशोत्सव काळात वैद्यकीय चिकित्सा शिबीर घेतले. सर्व आजारांवर गावकऱ्यांची तपासणी करण्यात आली. मोफत औषध गावकऱ्यांनी यावेळी देण्यात आल्याचे भोपी यांनी सांगितले.