नवी मुंबई : वाशी येथे झालेल्या खाटीक समाजाच्या मेळाव्यात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमात बोलताना, मंत्री नाईक म्हणाले होते की,“मी देखील बिबट्याची पिल्ले आणि हरणाची पिल्ले पाळली होती.
परंतू, वनमंत्री झाल्यावर हा कायदेशीर गुन्हा आहे. म्हणून मी त्यांना सोडून दिले.” या वक्तव्यावरुन शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी संताप व्यक्त केला असून नाईक यांनी ती पिल्ले सध्या कुठे आहेत सांगावे नाहीतर वेळ पडल्यास मी न्यायालयात जाऊन जनहित याचिका दाखल करेल असा इशारा नाईक यांना दिला आहे.
वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेले अनेक दिवसांपासून कलगितुरा सुरु आहेत. सध्या गणेश नाईक एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलण्याची एकही संधी सोडत नाही. तर, एकनाथ शिंदे यांचे पदाधिकारी तसेच मंत्री देखील गणेश नाईक यांना प्रतिउत्तर दिल्याशिवाय शांत बसत नाही. आता, नुकताच वाशी येथे झालेल्या खाटीक समाजाच्या भव्य मेळाव्यात गणेश नाईक प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते बोलता बोलता म्हणाले, “मी देखील बिबट्याची पिल्ले आणि हरणाची पिल्ले पाळली होती.
परंतू, वनमंत्री झाल्यावर हा कायदेशीर गुन्हा आहे. म्हणून मी त्यांना सोडून दिले.” त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यापाठोपाठ शिवसेना (शिंदे गट) पक्षा चे बेलापूर विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी नाईक यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत नाईक यांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. पाटकर म्हणाले, एखाद्या जबाबदार व्यक्तीने बिबट्याची पिल्ले आणि हरण पाळणे हे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा आहे. जर त्यांना ही पिल्ले सापडली होती तर, त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना किंवा वनविभागाला देणे आवश्यक होते.
परंतु त्यांनी तसे करण्याऐवजी स्वतःकडे ती ठेवून त्यांचे पालन-पोषण केले, ही बाब गंभीर आहे. त्यांना ही पिल्ले कुणी आणून दिली होती, आणि सध्या ती कुठे आहेत, याचा तपास होणे आवश्यक आहे. कारण हे प्रकरण वन्यजीवांच्या बेकायदेशीर संगोपनाशी निगडित गंभीर बाब आहे, असे पाटकर यांनी सांगितले. ‘वनमंत्री झाल्यावर मी त्यांना सोडून दिले’, असे वक्तव्य करणे म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस आहे. मंत्री म्हणून ते कायद्याचे पालन करणारे असले तरी त्यांच्या अशा कबुलीजबाबाने चुकीचा संदेश जातो. या प्रकरणात मी वेळ पडल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करेल असा इशारा पाटकर यांनी दिला आहे.