सरपंचपद निवडणूक
उरण तालुक्यातील चाणजे, नागाव, केगाव, वेश्वी, फुंडे व म्हातवली या ग्रामपंचायतींची निवडणूक २८ ऑक्टोबरला झाली असून या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक आज होत आहे. या सहा ग्रामपंचायतींपैकी फुंडे व नागाव ग्रामपंचायत वगळता चार ग्रामपंचायतींमध्ये कोणत्याही पक्षाला स्वबळावर सत्ता मिळणे शक्य नसल्याने अपक्ष तसेच कमी जागा जिंकलेल्या पक्षांच्या सदस्यांचा भाव वधारला आहे. आपली मते फुटू नयेत यासाठी निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच काही ग्रामपंचायत सदस्य आज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे या सरपंचपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
उरणमधील ग्रामपंचायत निवडणुकीत येथील सर्व पक्षांनी ताकद पणाला लावली होती. त्यानुसार फुंडे ग्रामपंचायत शेकाप तर नागाव ग्रामपंचायत शिवसेनेने जिंकली. वेश्वी ग्रामपंचायतीत सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन सहा सदस्यांची बिनविरोध निवडणूक केली आहे. यामध्ये १७ जागा असलेल्या चाणजे ग्रामपंचायतीमध्ये सेना व भाजप तर १३ जागा असलेल्या केगाव ग्रामपंचायतीमध्ये सेना व काँग्रेस यांच्यात सरपंचपदासाठी चुरस आहे. सरपंचपदाची निवडणूक आज दुपारी २ वाजता होणार आहे. या सहा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी चाणजे- सर्वसाधारण महिला, केगाव- सर्वसाधारण, नागाव -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला राखीव), वेश्वी -सर्वसाधरण, फुंडे -सर्वसाधारण (महिला) तर म्हातवली – सर्वसाधारण असे आरक्षण आहे.